संविधान मूल्यांच्या जतनासाठी कटिबद्ध राहा डीवायएसपी राजश्री पाटील; कराडमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा, चौकाचे ‘संविधान चौक’ नामकरण

संविधान मूल्यांच्या जतनासाठी कटिबद्ध राहा
डीवायएसपी राजश्री पाटील; कराडमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा, चौकाचे ‘संविधान चौक’ नामकरण
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रत्येकाने जतन करावे. महिलांना आज विविध क्षेत्रांत मिळणारा सन्मान आणि संधी संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे शक्य झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या कार्यासह संविधानामुळे महिलांच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला. यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून, पोलिसांकडून कोणावरही अन्याय होणार नाही; मात्र नागरिकांनीही मूलभूत कर्तव्यांचे पालन करावे, असे आवाहन कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील यांनी केले.
कराड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समता सामाजिक विकास संस्थेच्यावतीने संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अॅड. संभाजीराव मोहिते, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक दादासो शिंगण, कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक फारूक पटवेकर, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर, ॲड. मयूर माने प्रमुख उपस्थित होते.
ॲड. संभाजीराव मोहिते यांनी, संविधानातील मूल्ये केवळ वाचून किंवा बोलून उपयोग नाही, तर ती आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवली पाहिजे. संविधानाने देशातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली असून, त्याचा खऱ्या अर्थाने अंगीकार करण्याचे व्रत आपण स्वीकारूया, असे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी, सातारा जिल्हा पोलीस दल संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करून या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांनाही संविधान दिनी अभिवादन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष आनंदराव लादे यांनी, संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. कराडमधील समतावादी नागरिकांना एकत्र घेऊन दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. संविधानातील मूल्यांची समाजाला जाणीव व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. स्वातंत्र्य मिळाले असले, तरी समाजाला न्यायाची अधिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या सहभागाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. स्नेहा थोरात, दक्ष माने आणि पलक घोरपडे यांनी संविधान दिनानिमित्त मनोगते व्यक्त केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रतीचे सामूहिक वाचन करण्यात आले. कन्या प्रशाळा, उर्दू हायस्कूल आणि टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी शाळांना प्रमाणपत्रे देण्यात आली, तर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, समता सामाजिक विकास संस्थेच्या पुढाकाराने कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय चौकाचे ‘संविधान चौक’ असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावरण माजी नगरसेवक फारूक पटवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्ही. आर. थोरवडे, सारिका लादे, रेश्मा लादे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय कांबळे, विकास लोंढे, संतोष वायदंडे, दत्तात्रय पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास किशोर आठवले, किशोर थोरवडे, दत्तात्रय दुपटे, साबिरमिया मुल्ला, अनिलबापू घराळ, भारद्वाज वास्के, शेखर बर्गे, अशोक पाटील, बबन थोरवडे, अक्षय देसाई यांच्यासह नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






