
कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात
कर्जमर्यादा ३५ लाखांपर्यंत वाढविण्याची प्रक्रिया; व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न, नव्या इमारतीत लवकरच स्थलांतर
कराड : ग्रामदौलत न्यूज नेटवर्क
शिक्षकांची ‘कामधेनू’ म्हणून ओळख असलेल्या कराड-पाटण प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी लिमिटेड, कराडची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्षा पल्लवी यादव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संस्थेची आर्थिक स्थिती, सभासदांचे आर्थिक हित, कर्जव्यवस्था, भविष्यातील नियोजन तसेच नवीन इमारतीत स्थलांतर याबाबत सविस्तर चर्चा झाली. सभासदांच्या हितासाठी कर्जसुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच संस्थेच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यावर संचालक मंडळाने भर दिल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
यावेळी दत्ता पाटील, बाजीराव शेटे, भालचंद्र थोरात, तानाजी पाटील, बी. के. पवार, संजय नांगरे, मोहन सातपुते, सागर पाटोळे राहुल खैरमोडे, विनायक चव्हाण, विकास देशमुख, महेंद्र जानुगुडे, अनंत आघाव, सुनील नागे, आनंद देशमुख, शहाजी यादव, संतोष निकम, रमेश देसाई, उत्तम नांगरे यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते.
अपेक्षित गणसंख्या पूर्ण न झाल्याने सुरुवातीला सभा तहकूब करण्यात आली. नियोजित वेळेनंतर सभा पुन्हा सुरू झाली. संचालक अंकुश नांगरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अहवाल कालावधीत निधन झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. व्यवस्थापक श्रीधर यादव आणि उमाकांत फल्ले यांनी सभेतील विषयांचे वाचन केले.
अध्यक्षा पल्लवी यादव यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेत सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. मध्यम मुदत कर्जाची मर्यादा ३० लाखांवरून ३५ लाख रुपये करण्याची प्रक्रिया सुरू असून, सभासदांना अधिक आर्थिक दिलासा मिळावा यासाठी कर्जावरील व्याजदर कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन कर्जव्यवस्था अधिक सुलभ करण्याची भूमिका संचालक मंडळाने मांडली.
नवीन इमारतीचे काम पूर्णत्वाकडे असून, काम पूर्ण झाल्यानंतर संस्थेचे तेथे लवकरात लवकर स्थलांतर करण्याबाबतही सभेत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे संस्थेला अधिक प्रशस्त व सुविधायुक्त जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सभेतील चर्चेत दिनेश थोरात अंकुश नांगरे, भारत देवकांत, प्रदीप कुंभार, शशिकांत तोडकर, वैशाली पवार, संतोष यादव, रमेश जाधव व दत्तात्रय जाधव यांनी सहभाग घेत विविध प्रश्न व सूचना मांडल्या. यंदाच्या सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिला सभासदांची लक्षणीय उपस्थिती. शीला पाटील यांनी महिला संचालकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे सभेच्या व्यासपीठावरून अभिनंदन केले.अनिता पाटील सरिता शेडगे मधुमालती लिपारे कल्पना देशमाने मनीषा शिनगारे राजश्री आवळकर मीनाक्षी रसाळ नयन यादव जयमाला यादव वैशाली पाटील, अंजली मोहिते, रेखा कसबे, ज्योती नवाळे, अर्चना भोसले, स्वप्ना सावंत, ऋतुजा पाटील, सुवर्णा सातपुते, संगीता देसाई, मनीषा साळुंखे, माधुरी माने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सभासद उपस्थित होत्या. कराड पाटण तालुका व्यतिरिक्त इतर तालुक्यातून संतोष मासाळ, वीरधवल पाटील राजेंद्र जगताप संभाजी कदम यांच्यासह सहकाऱ्यांनी उपस्थिती लावली.
माजी चेअरमन दिनेश थोरात यांनी सभासदांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने कर्जमर्यादा वाढविणे, व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि नवीन इमारतीत लवकरात लवकर स्थलांतर करण्याची गरज व्यक्त केली. संस्थेचा कारभार अधिक सक्षम करून सभासदांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देण्यावर भर देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, विरोधी गटाच्या वतीने माजी चेअरमन विकास देशमुख, महेंद्र जानुगुडे व आघाव सर यांनी संस्थेच्या कारभारासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. संस्थेच्या विविध कामकाजाबाबत त्यांनी आपली भूमिका मांडत सभासदांच्या हिताच्या निर्णयांना पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली. उपस्थित प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीने उत्तरे देत शंकांचे निरसन करण्यात आले. त्यामुळे सभेत सत्ताधारी संचालक मंडळाच्या कामकाजाबरोबरच विरोधी गटाची भूमिकाही चर्चेत आली.
चर्चेअंती सभासदांच्या हिताचे प्रश्न सोडविणे, कर्जव्यवस्था अधिक सुलभ करणे, व्याजाचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि नवीन इमारतीच्या माध्यमातून संस्थेच्या सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे चित्र स्पष्ट झाले. सर्व विषयांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. उपाध्यक्ष अनुसया पवार यांनी आभार मानले. सभा यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सभेनंतर उपस्थित सभासदांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.






