
अंगणवाडी सेविकेच्या लेकीची उत्तुंग भरारी; ‘सिस्को’त २५.५० लाखांचे पॅकेज!
मसूरच्या अनुष्का गुरवची आंतरराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड; ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसमोर प्रेरणादायी आदर्श
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे मसूर (ता. कराड) येथील कु. अनुष्का सदानंद गुरव हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. अंगणवाडी सेविका आई आणि सामान्य कर्मचारी असलेल्या वडिलांच्या कुटुंबात वाढलेल्या अनुष्काने अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी ‘सिस्को’ (CISCO) बेंगलोर मध्ये वार्षिक २५ लाख ५० हजार रुपयांच्या पॅकेजवर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड मिळवली आहे. ग्रामीण भागातून सुरू झालेला तिचा शैक्षणिक प्रवास आता आंतरराष्ट्रीय कंपनीपर्यंत पोहोचला असून, तिच्या या यशामुळे मसूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आईच्या अंगणवाडीतून सुरू झाला यशाचा प्रवास
अनुष्काची आई सौ. संगीता सदानंद गुरव या मसूर येथे जिल्हास्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. अनुष्काच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात आईच्याच अंगणवाडीतून झाली. त्यानंतर तिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मसूर (मुली) येथे प्राथमिक शिक्षण, तर यशवंत विद्यापीठ, कराड संचलित इंदिरा कन्या प्रशाला, मसूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
दहावीनंतर तिने शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तब्बल ९५ टक्के गुणांसह पूर्ण केला. या गुणवत्तेच्या जोरावर तिला पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला. पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच तिने आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची छाप पाडत ‘सिस्को’सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली.
शांत स्वभाव, अभ्यासातील सातत्य अन् यशाला गवसणी
अनुष्का लहानपणापासूनच शांत, मनमिळाऊ, नम्र आणि अभ्यासू स्वभावाची म्हणून परिचित आहे. इतरांना मदत करण्याची वृत्ती, अभ्यासातील सातत्य आणि ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेले कष्ट हे तिच्या यशामागील महत्त्वाचे पैलू आहेत. कोणत्याही मोठ्या शहरातील शैक्षणिक वातावरणाचा प्रारंभापासून आधार नसतानाही, स्थानिक शाळांमधून शिक्षण घेत तिने आपल्या गुणवत्तेच्या बळावर अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
आई अंगणवाडीत सेवाभावी वृत्तीने काम करत असताना मुलीने आंतरराष्ट्रीय कंपनीत स्थान मिळवणे, ही गुरव कुटुंबासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. अनुष्काचे यश हे केवळ तिच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश देणारे आहे.
*अनुष्कावर अभिनंदनाचा वर्षाव
अनुष्काच्या या यशाबद्दल यशवंत विद्यापीठ, कराडचे सेक्रेटरी श्री. शिरीष किणीकर, संस्थेच्या अध्यक्षा सौ. पुष्पा किणीकर, इंदिरा कन्या प्रशाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, आजी सौ. छाया रामचंद्र गुरव, आई-वडील तसेच मसूरमधील ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनुष्काच्या यशामुळे मसूर परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






