जीवनशैली

यंदाच्या निवडणुकीत सहकार पॅनलला गतवेळेपेक्षा अधिक मोठे यश मिळेल : डॉ.सुरेश भोसले

यंदाच्या निवडणुकीत सहकार पॅनलला गतवेळेपेक्षा अधिक मोठे यश मिळेल :डॉ.सुरेश भोसले
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
गेल्या ६५ वर्षांपासून महाराष्ट्रातील आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गेल्या पाच वर्षांत सभासदांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले. ऊस वाहतूक आणि गाळप प्रक्रियेला गती देण्यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले. पारदर्शक कारभार आणि विकासकामांमुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, यंदाच्या निवडणुकीत सहकार पॅनलला गतवेळेपेक्षा अधिक मोठे यश मिळेल, असा विश्वास कारखान्याचे माजी चेअरमन तथा सहकार पॅनलचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
डॉ. भोसले म्हणाले, गेल्या कार्यकाळात संचालक मंडळाने सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत निर्णय घेतले. कारखान्याची क्षमता वाढवून ऊस वेळेत नेण्यावर भर दिला. त्यामुळे सभासदांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. गट निवडणुकीत सभासदांनी आम्हाला भरघोस पाठिंबा दिला होता. यावेळी त्याहून अधिक मताधिक्य मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही सहकार पॅनलच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी सहकाऱ्यांसह नव्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आली आहे. सभासदांचा मोठा पाठिंबा सहकार पॅनलला मिळत असून, गत पाच वर्षांतील पारदर्शक कामकाज हीच आमची खरी ताकद आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यात चांगला दर देणारा, वेळेत ऊस वाहतूक करणारा आणि सर्वाधिक गाळप करणारा कारखाना अशी कृष्णा कारखान्याची नवीन ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, सभासदांमध्ये उत्साहाचे चित्र आहे.
उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे सांगताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, केवळ २१ जणांनाच संधी देता येत असल्याने अनेक कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागली. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांना कृष्णा उद्योग समूहाच्या इतर संस्थांमध्ये संधी दिली जाईल. पॅनलच्या विजयासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान केला जाईल.
सातारा आणि सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, सर्वसामान्य सभासदांचा विश्वास आमच्या पाठीशी आहे. सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, हा आमचा सुरुवातीपासूनचा दृष्टिकोन राहिला आहे. सहकारी संस्था या सभासदांच्या हितासाठी असतात. त्यामुळे निवडणूकही सहकाराच्या तत्त्वांवरच लढवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उंडाळकर गटाच्या भूमिकेबाबत विचारले असता, पुढील काही दिवसांत अनेक गोष्टी स्पष्ट होतील. चांगल्या कामाच्या जोरावर सर्वच घटक सुरेशबाबांच्या नेतृत्वामागे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक बिनविरोध करण्याच्या शक्यतेबाबत बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जात आहोत. नीतीमूल्यांशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पारदर्शक पद्धतीने संस्था चालवणाऱ्या लोकांनाच संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा पाठिंबा असल्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही. संस्था सक्षमपणे चालवणाऱ्या नेतृत्वालाच संधी मिळावी, हा आमचा स्पष्ट निकष आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »