जीवनशैली

विद्यमान चेअरमनांना घरी बसवण्याची वेळ आली रामकृष्ण वेताळ; मसूर येथील सांगता सभेत घणाघात, खोटेपणा करुन सभासदांची फसवणूक

विद्यमान चेअरमनांना घरी बसवण्याची वेळ आली
रामकृष्ण वेताळ; मसूर येथील सांगता सभेत घणाघात, खोटेपणा करुन सभासदांची फसवणूक
कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तरमधील एकाच घरात गेली ५४ वर्षे सत्ता आहे आणि तीस वर्षे स्वतः सह्याद्रि’च्या चेअरमन पदावर आहेत. मात्र, त्यांना सभासदांच्या हिताचे काहीही घेणेदेणे नाही. याउलट विद्यमान चेअरमन आपल्या लाडक्या युवराजला कारखान्यावर कसे सेट करता येईल, यामध्ये ते मग्न आहेत. त्यामुळे आता त्यांनाच घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण वेताळ यांनी केले.
मसूर (ता. कराड) येथे झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेल प्रमुख निवासराव थोरात, धैर्यशील कदम यांच्यासह भिमराव पाटील, सचिन नलवडे, संपतराव माने, विश्वास काळभोर, प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. वेताळ म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आपले पॅनेल आहे. कारखान्याच्या विद्यमान चेअरमानांना अहंकार झाला होता आणि आत्ताच्या विद्यामान आमदारांनाही मोठा अहंकार झाला आहे. परंतु, अहंकार जास्त काळ टीकत नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून कारखान्याच्या विद्यमान चेअरमनांना घरी बसवण्याची विद्यमान आमदारांची आणि त्यांच्या बगलबच्यांची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी सह्याद्रि’ची निवडणूक तिरंगी केली. मात्र, आता या परिवर्तन घडवण्यासाठी सर्व स्वाभिमानी सभासदांनी मनामध्ये फक्त विमान चिन्ह लक्षात ठेवून आपल्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना निवासराव थोरात म्हणाले, सह्याद्रि कारखान्याच्या उभारणीमध्ये ज्या सभासदांनी सोसायटीचे कर्ज काढून शेअर्स रक्कम भरली, त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, विद्यमान चेअरमन यांनी त्यांच्या वारसांच्या नोंदी केल्या नाहीत. त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. संचालक मंडळाला हाताशी धरुन विद्यमान चेअरमनांनी खोटेपणा करुन सभासदांची फसवणूक केली. तसेच त्यांच्या पोटावर लाथ मारण्याच काम केले. आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे विद्यमान चेअरमन यांनी मोफत साखर देण्याचे जाहीर केले. गेल्या दहा वर्षांपूर्वी कारखान्याचे विस्तारिकरण होणे गरजेचे असताना, ते केले नाही. शेतकऱ्यांकडून माफिनामे घेणाऱ्यांना सभासद माफ करणार नाहीत. सभासदांची दिवाळी अंधारमय करण्याचे काम चेअरमनांनी केले. सभासदांना ‘सह्याद्रि’ आपला वाटला पाहिजे, असा घडवण्याचे काम आपण करु.
यावेळी बोलताना धैर्यशील कदम म्हणाले, येथे जमलेले भाडोत्री लोक नाहीत, हे सर्व सह्याद्रि’चे सभासद आहेत. गेल्या ५० वर्षांत कारखाना चांगल्या पद्धतीने चालवला असता, तर आज कारखाना कर्जात गेला नसता. अनेक कारखान्यांनी डिस्लरी वाढवली, कारखान्यांची प्रगती केली. मग सह्याद्रि कारखान्याची प्रगती का झाली नाही? दरवर्षी साखर पावसात भिजते, असा कारभार केला; तर कशी कारखान्याची प्रगती होईल. सह्याद्रि कारखान्याच्या प्रगतीसाठी योग्य व्यक्तीच्या हाती सत्ता जाणे गरजेचे आहे. ज्यांना आपण निवडून दिले, त्यांना पण आज वाटू लागले, सह्याद्रि पण आपल्या हातात आला पाहिजे. नेत्याने नेत्याप्रमाणे वागाव. मात्र, तुम्ही बालिश वागताय. विद्यमान आमदारांनी सर्वांना गंडवायच काम केले आहे. आपल्याला कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळवून द्यायचा आहे.
याप्रसंगी भिमराव पाटील, सचिन नलवडे, संपतराव माने, विश्वास काळभोर, प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुदाम चव्हाण, भिमराव डांगे, शैलेश चव्हाण, अमित जाधव, दादासाहेब चव्हाण, अमित पाटील, शिवाजी चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवार व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »