पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत विजयासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन रवींद्र चव्हाण यांचा विश्वास; कराडमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मतदार संवाद बैठक

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांत विजयासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन
रवींद्र चव्हाण यांचा विश्वास; कराडमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मतदार संवाद बैठक
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी भाजप व महायुतीने प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले आहे. दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित असून, पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळे मतदारांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळेल आणि दोन्ही उमेदवार भरघोस मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी कराड येथील हॉटेल फर्नमध्ये आयोजित मतदार संवाद बैठकीत ते बोलत होते. आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, उमेदवार कौस्तुभ गावडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीच्या पाठबळावर भाजपचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. मतदार नोंदणी ही या निवडणुकीतील महत्त्वाची बाब असून, पक्षाने नोंदणीपासून प्रचारापर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे. डॉ. स्मिता जाधव यांच्यात पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील. त्यामुळे मतदारांनी दोन्ही उमेदवारांना प्रथम पसंतीची मते देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी, भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करताना, पक्षाने केवळ निवडणुकांचा विचार न करता सर्वसामान्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले असल्याचे सांगितले. योग्य व्यक्तींना राजकारणात संधी देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना भरघोस मतदान करून जनसेवेची संधी द्यावी. लोकशाहीत जनता सर्वोच्च असून, मतदार भाजपच्या उमेदवारांच्या बाजूने कौल देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री जयकुमार गोरे यांनी, पुणे आणि दिल्लीतील आंदोलनांवर टीका करत, काही मागण्यांच्या माध्यमातून विरोधक राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी भाजपच्या काळात विकासकामांना गती मिळाल्याने जनतेचा पक्षावरील विश्वास वाढल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि नियोजनातून दोन्ही उमेदवारांना मोठे यश मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बैठकीला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र यादव यांनी आभार मानले.






