बालसुधारगृहातील मारहाणीत जखमी अल्पवयीन मुलाचा मृत्यू उपचारादरम्यान कोल्हापुरात मृत्यू; नातेवाईकांचे बालसुधारगृहासमोर ठिय्या आंदोलन

बालसुधारगृहातील मारहाणीत जखमी अल्पवयीन मुलाचा मृत्यू
उपचारादरम्यान कोल्हापुरात मृत्यू; नातेवाईकांचे बालसुधारगृहासमोर ठिय्या आंदोलन
कराड:संतोष शिंदे –
बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भांडणानंतर जखमी झालेल्या एका मुलाचा उपचारादरम्यान शनिवारी (दि. १२) मृत्यू झाल्याने कराड शहरात खळबळ उडाली. या घटनेनंतर मृत मुलाच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहासमोर ठिय्या आंदोलन सुरू करून घटनेची सखोल चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केल्याचे समजते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कराडच्या बालसुधारगृहातील काही अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला होता. यावेळी एका मुलाला मारहाण झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुलावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते.
कोल्हापूर येथे उपचार सुरू असतानाच शनिवारी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी बालसुधारगृह गाठले. तेथे त्यांनी ठिय्या आंदोलन करत संबंधित घटनेची चौकशी करण्याची तसेच या प्रकरणामागील नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, अल्पवयीन मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याला झालेली दुखापत कितपत गंभीर होती, तसेच बालसुधारगृहातील घटनेचे नेमके स्वरूप काय होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. वैद्यकीय अहवाल व तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण आणि या प्रकरणातील जबाबदारी स्पष्ट होणार आहे.
यावेळी समता सामाजिक संघटने कडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमशक्ती सातारा जिल्हा अध्यक्ष, माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी केली आहे.






