कराड मध्ये महेश नवमी निमित्त विविध उपक्रम उत्साहात संपन्न

महेश नवमी निमित्त विविध उपक्रम उत्साहात संपन्न
कराड : प्रतिनिधी –
कराड तहसील माहेश्वरी सभा, राजस्थानी महिला मंडळ, माहेश्वरी युवक मंडळ, श्री गोपालकृष्ण मंदिर ट्रस्ट, श्री बालाजी मंदिर ट्रस्ट आणि मारवाडी सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महेश नवमी पर्वानिमित्त आयोजित विविध सामाजिक, धार्मिक व सेवाभावी उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंगळवारी (दि. २३ जून) श्री गोपालकृष्ण मंदिर येथे सकाळी श्री महेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महेश नवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात तब्बल ८४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच त्यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर गोरक्षण सेवा ट्रस्ट संस्थेमध्ये गोसेवा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गोसेवेसाठी रु. ५,७५१/- ची देणगी प्रदान करण्यात आली. गोसंवर्धन व पशुसेवेचे महत्त्व यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले.
सायंकाळी श्री कृष्णामाई सांस्कृतिक कार्यालय (जुने), पंतांचा कोट, कराड येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ समाजबांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. दिवसभराच्या कार्यक्रमांमुळे धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सेवाभाव यांचे सुंदर दर्शन घडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कराड तहसील माहेश्वरी सभा, राजस्थानी महिला मंडळ, माहेश्वरी युवक मंडळ, श्री गोपालकृष्ण मंदिर ट्रस्ट, श्री बालाजी मंदिर ट्रस्ट आणि मारवाडी सांस्कृतिक मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच रक्तदान शिबिर व अन्य उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या सर्व दाते, स्वयंसेवक व नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले.






