कराड डाक विभागाची विक्रमी कामगिरी टपाल जीवन विमा योजनेत राज्यात तिसरा क्रमांक

कराड डाक विभागाची विक्रमी कामगिरी
टपाल जीवन विमा योजनेत राज्यात तिसरा क्रमांक
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत कराड डाक विभागाने उल्लेखनीय यश संपादन करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या मोहिमेदरम्यान विभागाने अवघ्या एका दिवसात तब्बल ४१ कोटी २० लाख ८० हजार रुपयांचा विमा व्यवसाय केला, तसेच एक कोटी पाच लाख रुपयांहून अधिक नवीन विमा हप्त्यांची नोंद केली. या कामगिरीमुळे कराड विभागाने पुणे क्षेत्रात प्रथम, तर संपूर्ण महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यापूर्वीही २३ जानेवारी २०२६ रोजी कराड डाक विभागाने एका दिवसात ४३ लाख रुपयांचा नवीन विमा हप्ता जमा करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे अल्पावधीत सलग विक्रम नोंदविणारा विभाग म्हणून कराडची ओळख निर्माण झाली आहे.
२४ मार्च २०२६ रोजी ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष मोहिमेत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून ही यशस्वी कामगिरी साध्य केली.
या यशाबद्दल अधीक्षिका स्वाती दळवी, डाक अधिकारी गणेश पाटील, अमित देशमुख व सी. एम. नदाफ यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच भविष्यातही टपाल जीवन विमा आणि डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी अण्णा पवार, संतोष शिंदे, गौरी कुंभार, परविन मुल्ला, सखाराम देवकाते, राजेंद्र पाटील, विशाल कोकरे, प्राची टोळे, सिद्धी टोळे, पूजा पॉल, निकिता सपकाळ, स्वप्निल ननवरे, जनार्धन राऊत यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश मोहिते यांनी केले. पोस्टमास्तर रामलिंग राजमाने, हनुमंत वेदपाठक, विकास अधिकारी किशोर तुपे, बालाजी मुंडे, सुभाष महानवर, यशवंत कदम, रामचंद्र मोरे आदींचीही उपस्थिती होती.






