जीवनशैली

भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ

भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराड उत्तरचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले रामकृष्ण वेताळ यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. वेताळ यांच्या निवडीने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव, सातत्यपूर्ण पक्षनिष्ठा आणि शेतीविषयक प्रश्नांवरील भक्कम भूमिका या पार्श्वभूमीवर पक्षाने वेताळ यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी त्यांनी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, सातारा जिल्हा उपाध्यक्ष तसेच कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक म्हणून काम पाहिले आहे. विविध पदांवरील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्य पातळीवरील नेतृत्वाची संधी देण्यात आल्याचे पक्षवर्तुळात सांगितले जाते.
कराड उत्तरमध्ये पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम वरिष्ठ नेतृत्वाच्या विशेष नजरेत भरले होते. काही काळापूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भातील अपप्रचार पसरवण्यात आला होता; मात्र नव्या जबाबदारीमुळे राज्य नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.
श्री. वेताळ यांच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीमुळे कराड उत्तरमध्ये भाजपाच्या संघटनात्मक बळकटीस नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारताना रामकृष्ण वेताळ म्हणाले, वरिष्ठांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. शेती आणि शेतकरी यांच्या समस्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्यांचे समाधान करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. महाराष्ट्र किसान मोर्चाचे कार्य देशासाठी आदर्श ठरेल, यासाठी कटिबद्ध आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »