जीवनशैलीमनोरंजन

‘वंदे मातरम्’च्या सुरांनी कराड दुमदुमले! १५ शाळांतील ३० समूहांचा सहभाग; २०० विद्यार्थ्यांनी सादर केले संपूर्ण गीत

‘वंदे मातरम्’च्या सुरांनी कराड दुमदुमले!
१५ शाळांतील ३० समूहांचा सहभाग; २०० विद्यार्थ्यांनी सादर केले संपूर्ण गीत
कराड: संतोष शिंदे –
देशभक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा जागर घडविणाऱ्या ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक स्वरांनी सोमवारी कराडमधील शिराळकर हॉल भारावून गेला. ज्ञानभारती-कराड, जिजामाता स्मारक समिती, पुणे आणि शिक्षण मंडळ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संपूर्ण वंदे मातरम्’ पाठांतर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराड परिसरातील १५ शाळांमधील ३० समूहांतील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
शिराळकर हॉल येथे झालेल्या या स्पर्धेत प्रत्येकी सहा विद्यार्थ्यांच्या समूहांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताचे सादरीकरण केले. सुरेल गायन, शब्दांचे स्पष्ट उच्चार, शिस्तबद्ध समूह सादरीकरण आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले.
राष्ट्र सेविका समिती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या बौद्धिक प्रमुख सौ. मैत्रेयी शिरोळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ, कराडचे सचिव चंद्रशेखर देशपांडे होते.
‘वंदे मातरम्’ गीताच्या सुमारे १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेताना मैत्रेयी शिरोळकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात या गीताने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या भावावस्थेतून स्फुरलेले हे गीत पुढे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा मंत्र ठरल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी ‘आपण भारताचे सुपुत्र आणि सुपुत्री आहोत’ हा भाव मनात सदैव जपावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ज्ञानभारतीच्या समन्वयक मंजिरी सबनीस यांनी स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा दृढ व्हावी, ‘वंदे मातरम्’विषयी आदर व अभिमान निर्माण व्हावा तसेच भारतीय संस्कृती आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात चंद्रशेखर देशपांडे यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणासोबतच सहशालेय उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नसून, राष्ट्रभक्तीची भावना जागविणारा प्रेरणामंत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा देशपांडे व डॉ. सुचेता हुद्देदार यांनी केले. त्यांनी ‘वंदे मातरम्’चा इतिहास, त्या काळातील सामाजिक-राजकीय परिस्थिती तसेच गीतातील काही शब्दांचे अर्थ यांची माहिती देत कार्यक्रमाची प्रभावी गुंफण केली. आलापिनी जोशी, गायत्री कुलकर्णी आणि शुभांगी पटवर्धन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन नम्रता कंटक यांनी केले. कार्यक्रमाला योगेश कदम सहप्रायोजक म्हणून लाभले.
स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्रे व ‘वंदे मातरम्’ पुस्तिका देऊन गौरविण्यात आले, तर सहभागी शाळांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानभारतीच्या सुषमाताई काळे, डॉ. सुचेता हुद्देदार, सुवर्णा देशपांडे, सुखदा विदार, अनघाताई बर्डे, माधुरीताई साने, स्वाती भागवत, राजश्री शेंडे, आरती कुलकर्णी, डॉ. नेहा वाचासुंदर, प्रबोधिनी किरपेकर, नम्रता कंटक व पूनमताई वास्के यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल : लहान गट
प्रथम – जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय, द्वितीय – एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल.
मध्यम गट : प्रथम – जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय, द्वितीय – शेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, तृतीय – एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूल.
मोठा गट : प्रथम – जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय, द्वितीय – शेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, तृतीय – टिळक हायस्कूल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »