गोटे, वारुंजी,घोणशीसह परिसरात विद्युत मोटर केबलची चोरी शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

गोटे, वारुंजी,घोणशीसह परिसरात विद्युत मोटर केबलची चोरी
शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
कराड तालुक्यातील गोटे,वांरुजी,घोणशीपरिसरात अज्ञात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून कोयना नदीकाठच्या पाच ते सहा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबलची चोरी केली आहे.
भर उन्हाळ्यात शेतीला पाण्याची अत्यंत गरज असतानाच ही घटना घडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी कोयना नदीकाठच्या मळी क्षेत्रांतील शेती पंपांना लक्ष्य केले. यामध्ये गोटे मधील दोन ते तीन व वांरुजी येथील एक ते २ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबल लंपास केले आहेत. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी विद्युत पेटी पासुन ते मोटारीपर्यंतची जमिनीखाली गाडलेली केबल देखील उकरून चोरुन नेली आहे. मंगळवारी सकाळी काही शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी नदीकाठी गेले असता मोटर सुरू होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केली असता केबल कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
यामध्ये गोटे येथील शेतकरी मुजीर इनामदार यांच्यासह वारुंजी,घोणशी मधील चार ते पाच शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशा परिस्थितीत पिकांना पाणी देणे आवश्यक असतानाच केबल चोरीला गेल्याने शेतीचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. नवीन केबल खरेदी करणे आणि ते पुन्हा बसविणे शेतकरी वर्गासाठी मोठा आर्थिक भुर्दंड ठरणारा आहे.
एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे या चोरांचा ताप अशा दुहेरी संकटात आम्ही सापडलो असल्याचे मत काही शेतकरी वर्गानी व्यक्त केले. गोटे आणि वारुंजी परिसरात सातत्याने होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या टोळीचा छडा लावून त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गामधून व ग्रामस्थांमधून केली जात आहे.






