रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त
कराड: संतोष शिंदे-
शहरातील गुरूवार पेठेतील दर्गा मोहल्ला शेजारी असलेल्या पान शॉपच्या शेजारी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले. बुधवार, दि. २६ रोजी कराड शहर पोलिसांनी ही कारवाई करत त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडून एक पिस्टल, जिवंत काडतुस असा 66 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
साद अश्पाक मुलाणी (वय 23) रा. आयेशा कॉम्पलेक्स रूम नं. 16 आझाद चौक, शनिवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक राजश्री पाअील यांनी शहरातील गुन्हेगारी टोळ्या व गटातटांचा समुळ नाश करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. कराड शहर पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून गुरूवार पेठेतील दर्गा मोहल्ला शेजारी असलेल्या नाझ पानशॉपचे शेजारी एकजण पिस्टल घेऊन वावरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तेथे सापळा रचून साद मुलाणीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस मिळून आले. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिसांनी केली.






