कराड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापन करा
गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे; प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळापूर्व तयारीविषयी मार्गदर्शन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराड तालुक्यातील शासनमान्य सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विद्यालयात दाखल असलेले विद्यार्थी त्याच शाळेत शिकले पाहिजेत, याची दक्षता घ्यावी. तसेच परिवहन समित्या स्थापन करावी. विद्यार्थ्यांची चेंगराचेंगरी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन कराडचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांनी केले.
येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये कराड तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची वर्षभरामध्ये शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम व शाळापूर्व तयारी याविषयी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, नितीन जगताप, रमेश कांबळे, जमिला मुलाणी, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट, सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे, संचालक जगन्नाथ कुंभार, कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, केंद्रप्रमुख मधुसूदन सोनवणे, निवास पाटील, विशेष शिक्षक केशव चौगले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बिपिन मोरे म्हणाले, शालेय पोषण आहाराची माहिती रोजच्या रोज भरावी. यापुढे मागील माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. तसेच आधार अपडेशन, मुलांची सुरक्षितता, फी निर्धारण याची काळजी घ्या व चालू शैक्षणिक वर्षातील ऑनलाइन व ऑफलाईनची सर्व कामे वेळेवर करून शालेय कामकाज सुरळीतपणे पार पाडा. तसेच ज्यावेळी मुख्याध्यापकांची बैठक असेल, त्या बैठकीला मुख्याध्यापकांनी हजर राहावे. कोणीही प्रतिनिधी पाठवू नये. प्रतिनिधी पाठवल्याचे आढळल्यास संस्थेकडे रीतसर नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सन्मती देशमाने, नितीन जगताप, जमीला मुलाणी, रमेश कांबळे, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय परीट, विशेष शिक्षक केशव चौगले आदींनी वर्षभरात करावयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी केले. सूत्रसंचालन कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप यांनी आभार मानले.