आरोग्यजीवनशैली

‘कृष्णा’च्या माध्यमातून ‘रोटरी आशा एक्सप्रेस’ धावणार गावोगावी कॅन्सर निदानासाठी अनोखा उपक्रम; अत्याधुनिक साधनांनी सज्ज फिरत्या बसचे लोकार्पण

‘कृष्णा’च्या माध्यमातून ‘रोटरी आशा एक्सप्रेस’ धावणार गावोगावी
कॅन्सर निदानासाठी अनोखा उपक्रम; अत्याधुनिक साधनांनी सज्ज फिरत्या बसचे लोकार्पण
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. पण लवकर निदान आणि वेळेत उपचार झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र कॅन्सरच्या भितीमुळे अनेकजण तपासणीकडे कानाडोळा करतात. यावर उपाय म्हणून रोटरी क्लबने ‘रोटरी आशा एक्सप्रेस’ ही फिरती कर्करोग तपासणी बस तयार केली आहे. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून ही ‘रोटरी आशा एक्सप्रेस’ सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाणार आहे.
याठिकाणी कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञांची टीम जनजागृती करणार असून, अद्ययावत साधनांनी सज्ज असलेल्या या मोबाईल बसच्या माध्यमातून नागरिकांची मोफत कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने तोंडाचा कॅन्सर, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग व कान-नाक-घसा कर्करोगाची मोफत तपासणी केली जाणार आहे.
रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वॉलसॉल (यु. के.), द रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल यांच्या आर्थिक सहकार्यातून साकारण्यात आलेल्या या अनोख्या बसचे लोकार्पण कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, इंग्लंड येथील रोटरी क्लब ऑफ वॉलसॉलचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. मुकुंद चिद्रावार, रोटरी क्लबच्या डिस्ट्रीक्ट गव्हर्नर सौ. स्वाती हेरकळ, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलचे कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, रोटरी क्लब ऑफ वाईच्या अध्यक्ष डॉ. प्रेरणा ढोबळे, सचिव संतोष निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, रोटरी क्लबच्या सहकार्यातून उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक बसमुळे कर्करोगाबद्दल जनजागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच ही बस थेट गावागावात जाऊन रुग्णांची मोफत तपासणी करणार असल्याने, ग्रामीण भागातील लोकांना विशेषत: महिलांना याचा मोठा लाभ होणार आहे. सामाजिक कार्याची उर्मी बाळगून काम करणाऱ्या रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. समाजाच्या प्रगतीत रोटरीच्या सर्व सदस्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
या सोहळ्यासाठी खास इंग्लंडहून आलेले रोटरी क्लब ऑफ वॉलसॉलचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. मुकुंद चिद्रावार म्हणाले, रोटरीमधील माझ्या कारकिर्दीतील हा एक महत्वपूर्ण प्रकल्प असून, या बसमुळे हजारो लोकांचे, मुख्यत: महिलांचे आयुष्य बदलणार आहे. वेळीच निदान व योग्य उपचारामुळे कर्करोग बरा होण्यास मदत होणार आहे.
सौ. स्वाती हेरकळ म्हणाल्या, प्रत्येक गावात आरोग्य सेवा देण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षे प्रयत्न करत होतो. ग्रामीण जनतेसाठी उपयोगी ठरु शकेल, असा प्रकल्प राबविण्याचा विचार मनात असतानाच कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर उपचारासाठी सुरु असलेल्या उत्तुंग कामाची माहिती मिळाली. यातूनच हा फिरत्या कॅन्सर तपासणी बसचा प्रकल्प साकारला केला. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ वाईसह युनायटेड किंग्डम राष्ट्रांमधील विविध रोटरी क्लबने एकत्र येत निधी उभारत, आपल्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडविले आहे.
यावेळी डॉ. प्रेरणा ढोबळे व डॉ. आनंद गुडूर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते यांनी आभार मानले. यावेळी सौ. गौरवी भोसले, सौ. उज्वला चिद्रावार, रोटरी क्लब ऑफ वाईचे मदन पोरे, दीपक बागडे, प्रमोद शिंदे, डॉ. राहुल फासे, अमरसिंह पाटणकर, कृष्णा विद्यापीठाच्या इनोव्हेशन ॲन्ड इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. डी. के. अगरवाल, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, डॉ. रश्मी गुडुर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कराड आणि रोटरी क्लब ऑफ अकलूजचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »