जीवनशैली

सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे सलग अनेक वर्षे सत्ता होती. मात्र या काळात काँग्रेसला जेवढा विकास करता आला नाही, तेवढा मोदी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत झाला आहे. आता देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील. अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. कार्वे (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कार्वे (ता. कराड) भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, धोंडिराम जाधव, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, दत्तात्रय देसाई, दयानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, विजय जगताप, संग्राम बर्गे, संपतराव थोरात, बाळासाहेब निकम, , प्रवीण थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, काँग्रेसने विश्वास गमावल्याने भाजपच्या हाती लोकांनी सत्ता दिली. अवघ्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या महायुतीने देशात कायापालट करण्यासारखे काम केलेले आहे. ज्या लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला, त्यांना गृहीत धरण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. लोकांच्या कष्टाच्या पैशाचा अनेकांनी अपहार केला. सर्वसामान्य लोकांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, त्या केलेल्या नाहीत. लोकांची आता कुठे उन्नती होत आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार सत्तेवर असेल तर निश्चितपणे विकास सातत्याने असाच होत राहील. माझ्याविरोधात महाविकास आघाडीचा जो उमेदवार उभा केलेला आहे, त्याने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केलेला आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांना निवडून देऊन विकास कसा होणार हे जनतेने लक्षात घ्यावे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, भारताची विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. स्टार्ट अपसारखी कल्पना या सरकारने विकसित केली. कोरोनाच्या काळामध्ये जगातील केवळ तीन ते चार देश व्हॅक्सीन तयार करू शकले, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. भारत सरकारने देशाच्या १४० कोटी जनतेला कोविड प्रतिबंधक मोफत व्हक्सिनेशन केले आहे, ही केवढी मोठी बाब आहे. प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचे धोरण मोदी सरकारने राबवलेले आहे, लोकसभेची यंदाची निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. उदयनराजे भोसले यांना पुन्हा लोकसभेत पाठवायचे आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार दौरा सुरू असून त्याला कराड तालुक्यातून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कराड दक्षिणमधील गावांमध्ये अवघ्या दोन वर्षात ४३३ कोटी रुपयांचा निधी आणण्यात यश आलेले आहे. उदयनराजेंचे हात पाठीशी असल्यामुळे हे शक्य झाले. सर्वांनी बूथनिहाय काम करावे.
निवासराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. संपतराव थोरात यांनी आभार मानले. यावेळी कार्वेचे सरपंच सर्जेराव कुंभार, उपसरपंच राहूल जाधव, माजी सरपंच संदीप भांबुरे, महेश थोरात, वैभव थोरात, संपतराव थोरात, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »