शिक्षण संस्थांनी आदर्श कारभार करावा
अशोकराव थोरात; जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था व शाळांचा पुरस्कारांनी गौरव
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
शिक्षण संस्थांच्यापुढे शासनाने आज अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. आज शाळा हे मंदिर राहिलेले नसून ते शोषणाचे केंद्र बनले आहे. संस्था, शाळांना सध्या अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक निधी शाळांनी कुठून उभा करावा? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. इतक्या संकटातही खाजगी शिक्षण संस्थांनी आपला कारभार आदर्शवत करावा, असे प्रतिपादन सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणेचे उपाध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केले.
कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव, ता. महाबळेश्वर येथे सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील 2023-24 च्या तीन आदर्श शिक्षण संस्था व राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील तीन शाळा व प्रत्येक तालुक्यातील तीन शाळांचा गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणेचे सहकार्यवाह माजी आ. विजय गव्हाणे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, पुणेचे अध्यक्ष विजय कोलते, सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नितीन नलवडे, रवींद्र फडणवीस, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव एस. टी. सुकरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांच्या अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात आदर्श शिक्षण संस्था फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण (प्रथम), शिक्षण मंडळ, बनवडी ता. कराड (द्वितीय), सत्यशोधक ज्योत्याजीराव बयाजीराव फाळके पाटील विकास ट्रस्ट सातारारोड, ता. कोरेगाव (तृतीय) मिळाला. तसेच 16 आदर्श शिक्षण संस्था व जिल्ह्यातील शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमातील यशस्वी शाळांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय गव्हाणे म्हणाले, शिक्षण संस्थांनीच शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचवली. त्यातूनच अनेक विद्यार्थी घडले. राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. आजचे शासन मात्र तो आग्रह मोडीत काढत आहे, ही खंतही व्यक्त करत आजचे शासन शिक्षण संस्थांचे अधिकार हिसकावून संस्था बंद पाडण्याचा घाट घालीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विजय कोलते यांनी नवीन शैक्षणिक धोरण स्किल बेसवर शासन सुरू करत असून त्यासाठी शासनाकडे प्रशिक्षित शिक्षक आहे का? असा सवाल व्यक्त केला. नितीन नलवडे व रवींद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक एस. टी. सुकरे यांनी केले. कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षण संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सर्व पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.