बार्टीच्या धर्तीवरील आर्टीच्या स्थापनेचे स्वागत दलित महासंघाचा कराडमध्ये जल्लोष; गुलालाची च्या उधळणी व पेढे वाटून आनंद साजरा
दलित महासंघाचा कराडमध्ये जल्लोष; गुलालाची च्या उधळणी व पेढे वाटून आनंद साजरा
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
राज्यातील तमाम मातंग समाजाच्या अस्मितेचा आणि भावी पिढीच्या दृष्टीने बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करणे हा महत्वाचा प्रश्न होता. त्यासाठी दलित महासंघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आर्टीच्या स्थापनेसाठी रस्त्यावरची लढाई सुरू होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना केल्याचे जाहीर केल्याने संपूर्ण राज्यासह मातंग समाज व दलित महासंघाचा वतीने कराडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मातंग समाज हा महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील दोन नंबरची लोकसंख्या असलेला समाज आहे. परंतु, बार्टीच्या माध्यमातून या समाजावर अन्याय होत असल्याची समाजाची भावना होती. त्यातूनच आर्टीच्या स्थापनेचा मुद्दा गेली काही वर्ष चर्चेत होता. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून आर्टीची स्थापना झाली आहे. यामध्ये दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. दलित महासंघाने १ जानेवारी 2021 पासून आर्टीच्या स्थापनेचा मुद्दा लावून धरत त्यासाठी राज्यभर आंदोलने केली. अखेर त्यांच्या मागणीला व आंदोलनाला यश आले आहे.
येथील तहसीलदार कार्यालयासमोर दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, जयवंत सकटे, सुरज घोलप, संजय तडाखे, प्रा. दिपाली वाघमारे, हरिभाऊ बल्लाळ, अभियंता आघाडीचे राहुल वायदंडे, जाई प्रकाश, जयसिंग वायदंडे, मधुकर मोरे, विजय वायदंडे, सितारा वायदंडे, कुमारी स्नेहल, शांताराम लोखंडे, संग्राम वायदंडे, शाहू वायदंडे आदींनी फटाक्यांच्या आतिशबाजी व आणि गुलालाच्या उधळणीत एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.