कराडाला जानेवारीत पहिला आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव; डॉ. सुरेश भोसले
कराडाला जानेवारीत पहिला आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव; डॉ. सुरेश भोसले
कराड : ग्राम दौलत-
कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज पासून प्रारंभ झाला आहे. आप्पासाहेबांनी आपल्या कुशल कार्यकर्तृत्वाने कृष्णाकाठी समृद्धीची विकासगंगा आणली. त्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून शेतीक्षेत्राची आमूलाग्र प्रगती झाली. किंबहुना शेतकरी वर्गाची आर्थिकदृष्ट्या भरभराट झाली. याच पार्श्वभूमीवर कराड येथे कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कृष्णा सह. साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सह. बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सदर महोत्सव 17 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
आजच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे कृषीक्षेत्रात
नवनवीन आव्हाने निर्माण होत आहेत.
अशा परिस्थितीत आपल्या भागातील
शेतकऱ्यांना जगभरात कृषी क्षेत्रात सुरु
असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची, नव्या
संशोधनाची, नव्या उत्पादनांची माहिती
एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, यासाठी
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो.
कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत
कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि
कृष्णा उद्योग समूहाच्या सहकार्यातून
कराड येथे १७ ते २१ जानेवारी २०२४
दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा
कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे
आयोजन करण्यात आले आहे. कराडमधील हा पहिला आंतरराष्ट्रीय कृषी महोत्सव असून, भारतातील पहिले ए सी. हॉलमध्ये आयोजित केलेले कृषी प्रदर्शन असणार आहे.
शेतकरी व नागरिकांना शासनाच्या विविध कृषी योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाविन्यपूर्ण अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय इत्यादीबाबतचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी एक व्यापक व्यासपीठ निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. यशस्वी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी तंत्रज्ञ आणि कृषी विचारवंतांचा महामेळा यानिमित्ताने कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांना अनुभवता येणार असून, या सगळ्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधीदेखील यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. याशिवाय धान्य व खाद्य महोत्सव, पशु, फळे, फुले, देशी- विदेशी भाजीपाला महोत्सव यांचेही• आयोजन करण्यात आल्याने, एकूणच सर्वच स्तरातील शेतकरी वर्गाला अनोखी पर्वणी प्राप्त होणार आहे.
५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून, कृषी यंत्रसामुग्री, नर्सरी व ग्राफ्टेड प्लान्ट, कृषी तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया दालन, धान्य महोत्सव, लघुउद्योग, यशोगाथा, शासकीय विभाग, महिला बचत गट आदींचे ५०० हून अधिक स्टॉल, आंतरराष्ट्रीय फ्लॉवर शो, आंतरराष्ट्रीय फ्रूट शो, व्हेजिटेबल शो, प्रात्यक्षिके, परिसंवाद, आदर्श गाव असे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या महोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या भाजीपाला महोत्सवात एक्सॉटिक व्हेजिटेबलचे विशेष दालन उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये २८ विविध देशांमधील भाजीपाल्याचे लाईव्ह सॅम्पल्स व पिके ठेवण्यात येणार आहेत. महोत्सवात शेतकऱ्यांबरोबरच प्रदर्शन बघायला येणाऱ्या ग्राहकांना शेतकरी ते थेट ग्राहक
विक्रीच्या संकल्पनेतून तांदूळ, गहू, ज्वारी, कडधान्य, बेदाणा, हळद, मसाले खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी धान्य महोत्सवात विशेष दालन उभारणी करुन, त्यामध्ये शेतकऱ्यांचे स्टॉल लावले जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, बियाणे महामंडळ, कृषी औद्योगिक विकास महामंडळ, वखार महामंडळ, उद्योग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा शासकीय संस्थांचा या महोत्सवात विशेष सहभाग राहणार असून, राज्य व केंद्र शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजनांचे विशेष दालन याठिकाणी साकारले जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध विभागांची व योजनांची माहिती प्राप्त करुन घेता येणार आहे.
पुष्प महोत्सवासाठी विशेष वातानुकूलित दालन उभारले जाणार असून, देशी, विदेशी फुले व फुलझाडे या दालनामध्ये शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहेत. व्हर्टीकल फार्मिंग, संरक्षित शेती, बिनमातीची शेती, ड्रोन फवारणीसह अन्य कृषी औद्योगिक साधनांची प्रात्यक्षिकेही यावेळी सादर केली जाणार आहेत. प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी भव्य शामियाना महोत्सवस्थळी उभारण्यात येणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी अशा प्रदर्शनाचे महोत्सवांचे आयोजन करणाऱ्या शुअर शॉट व स्मार्ट एक्सपो इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही या मॅनेजमेंटचे प्रमुख गिट्टे-पाटील यांनी केली आहे.