अडीच फूट उंचीची ‘पुंगनूर’ गाय, बुटके बोकड-शेळ्या, १२ किलोचा टर्की कोंबडा आणि विदेशी पोपटांचे आकर्षण कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात वाढू लागली विक्रमी गर्दी

अडीच फूट उंचीची ‘पुंगनूर’ गाय, बुटके बोकड-शेळ्या, १२ किलोचा टर्की कोंबडा आणि विदेशी पोपटांचे आकर्षण
कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात वाढू लागली विक्रमी गर्दीत
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
अडीच फूट उंचीची दुर्मीळ ‘पुंगनूर’ जातीची गाय, दीड ते दोन फूट उंचीचे बुटके बोकड व शेळ्या, तब्बल बारा किलो वजनाचा टर्की कोंबडा तसेच रंगीबेरंगी मोठे विदेशी पोपट… अशा वैशिष्ट्यपूर्ण पशुपक्ष्यांच्या दर्शनासाठी कराडमधील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात मोठी गर्दी होत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी शेवटच्या दोन दिवसांतील अलोट गर्दीचे संकेत मिळू लागले आहेत.
शेती उत्पन्न बाजार समिती कराड, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने विसावे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन कराड येथील बैल बाजार तळावर सुरू आहे. शनिवारी सकाळपासूनच शेतकरी कुटुंबांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सकाळच्या सत्रात बारामती येथील कृषी तज्ज्ञ तुषार जाधव यांनी ‘ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात सातारा येथील सेंद्रिय शेती तज्ज्ञ शशिकांत साळुंखे यांनी ‘सेंद्रिय शेती’ या विषयावर व्याख्यान दिले. या दोन्ही सत्रांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत लाखो नागरिकांनी प्रदर्शनास भेट दिली.
अडीच फूट उंचीची दुर्मीळ ‘पुंगनूर’ गाय आकर्षणाचा केंद्रबिंदू
कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील सर्जेराव शामराव मोहिते यांनी आणलेली अडीच फूट उंचीची ‘पुंगनूर’ जातीची गाय अबालवृद्धांचे लक्ष वेधून घेत आहे. तिरुपती बालाजी देवस्थानात देवाच्या अभिषेकासाठी या गायीचे दूध, दही व तूप वापरले जाते.
१ ते २५ लाख रुपये किंमत असलेली ही गाय दररोज ३ ते ५ लिटर दूध देते. दुधाला प्रतिलिटर ३०० ते ५०० रुपये, तर तुपाला प्रतिकिलो ५ ते १० हजार रुपये दर मिळतो, अशी माहिती देण्यात आली.
बुटके बोकड, शेळ्या आणि विदेशी पक्ष्यांची रेलचेल
दीड ते दोन फूट उंचीचे शिंगे असलेले बुटके बोकड व दूध देणाऱ्या शेळ्या पाहण्यासाठी नागरिक कुतूहलाने चौकशी करताना दिसत आहेत. यासोबतच पर्शियन मांजर, फायटर असील कोंबडा, पाळीव ससे, ब्लॅक अँड व्हाईट कबुतरे, विविध जातींचे रंगीबेरंगी विदेशी पोपट व आफ्रिकन बर्ड्स प्रदर्शनात दाखल झाले आहेत.
हे सर्व पशुपक्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कागल येथील हैदरअली बर्ड ब्रिडिंग फार्मच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहेत.
तब्बल १२ किलो वजनाचा टर्की कोंबडा
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील करोली गावच्या स्वराज ऍग्रो फार्मच्या स्टॉलवर तब्बल १२ किलो वजनाचा टर्की कोंबडा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
याशिवाय टर्की, चिनी कोंबड्या, इंडियन बदक, राजहंस बदक, गावरान, कडकनाथ, गिरीराज, सातपुडा, सोनाली, कावेरी व ब्लॅक अस्ट्रोलॉप अशा विविध जातींच्या कोंबड्या-कोंबडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत






