जीवनशैली

ऊस, केळी, फुले, फळे, फळभाज्या व पालेभाज्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ; बक्षीसांची पर्वणी

ऊस, केळी, फुले, फळे, फळभाज्या व पालेभाज्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ; बक्षीसांची पर्वणी
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क
येथील स्वातंत्र्यसेनानी शामराव पाटील फळे फुले भाजीपाला मार्केट मधील बैल बाजार तळावर दि. २६ ते ३० डिसेंबर २०२५ कालावधीत होत असलेल्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषि महोत्सव २०२५ मध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दर्जेदार ऊस, केळी, फुले, फळे, फळभाज्या व पालेभाज्या स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये शुक्रवार दिनांक २६ रोजी, ऊस – सर्व जातीचे वाड्यास मुळासह अखंड ऊस (५ उसाची मोळी),
शनिवार दिनांक २७ रोजी – केळी – सर्व प्रकारचे केळीघड,
रविवार दिनांक २८ रोजी – फुले – सर्व प्रकारची फुले (गुलाब, जरबेरा, कार्नेशन, निशिगंध, ग्लॅडिओलस, झेंडू आदी.),
सोमवार दि . २९ रोजी – फळे – सर्व प्रकारची फळे (आंबा, द्राक्षे, डाळिंब, सिताफळ, चिकू, आवळा, पपई, पेरू आदी),
मंगळवार दि. ३० रोजी- भाजीपाला – सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या या गटात शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.‌सदरच्या सर्व गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ रुपये अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत.
जे शेतकरी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छितात त्यांनी २६ डिसेंबर रोजी दुपारी ०२.०० वा. व इतर दिवशी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण कृषि, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या ठिकाणी जिल्हा परिषद, कृषि विभागाच्या स्टॉलमध्ये दिलेल्या वेळेत नमुने आणून द्यावेत. यासाठी नावनोंदणी सुरु आहे.
दरम्यान, बक्षिसाबाबत कमिटीचा निर्णय अंतिम राहणार असून नमुना प्रदर्शनात ठेवण्यासाठी आकर्षक पॅकींग करून आणावे, नमुना कमीत कमी १ किलो वजन अथवा नमुना नजरेत भरेल इतक्या संख्येने असावा. पीक स्पर्धा विनामूल्य असून या स्पर्धेत कोणताही शेतकरी अथवा संस्था भाग घेऊ शकेल. एका शेतकऱ्याचा एकच नमुना स्विकारला जाईल. स्पर्धेत आणलेला नमुना परत दिला जाणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी कराड पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी श्री. संतोष किर्वे (०२१६४) २२२२२१, मोबाईल. ८२०८२१४१७८ आणि कराड मधील महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती क्षमादेवी माळी (०२१६४) २२३२३७, मोबाईल. ९५१८५४४६७६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »