कराडला आजपासून यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन; प्रदर्शनाचे यंदा 20 वे वर्ष

कराडला आजपासून यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन; प्रदर्शनाचे यंदा 20 वे वर्ष
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-: –
येथील स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट आवारात २० वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आज शुक्रवार, दि. 26 डिसेंबर 2025 पासून सुरू होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई राहणार आहेत, अशी माहिती शेती उत्पन्न बाजार समिती कराडचे सभापती सतीश इंगवले यांनी दिली.
शुक्रवार, दि. 26 रोजी दुपारी 2 वाजता प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन, तर सायंकाळी 4 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य उद्घाटन सोहळा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ऊस पीक स्पर्धा व नाविन्यपूर्ण कृषी अवजारे निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दि. 27 रोजी केळी घड प्रदर्शन व स्पर्धा, तर सायंकाळी “उत्सव कृषी सौभाग्यवतींचा – खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम होणार आहे.
रविवार, दि. 28 रोजी फुले तसेच गाय–म्हैस–बैल प्रदर्शन व स्पर्धा होणार असून सायंकाळी “जल्लोष – चांडाळ चौकडींचा” हा कॉमेडी शो आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, दि. 29 रोजी फळे व श्वान (डॉग) प्रदर्शन व स्पर्धा, तर मंगळवार दि. 30 रोजी भाजीपाला पीक, शेळी–मेंढी व पक्षी प्रदर्शन व स्पर्धा होणार असून सायंकाळी 4 वाजता समारोप होईल. यावेळी बक्षीस वितरण व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात सुमारे 400 स्टॉल्स असून पिलरलेस डोम पद्धतीचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. स्वतंत्र पशु–पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्स प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहेत.
लोकनेते स्व. विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचे यंदा 20 वे वर्ष असून, राज्यातील दर्जेदार कृषी प्रदर्शनांमध्ये याचा समावेश होतो. शेती उत्पन्न बाजार समिती कराड, कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा व महाराष्ट्र शासनाच्या आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकरी बांधव व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






