जीवनशैली

स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ २६ डिसेंबरपासून कराडला भव्य प्रदर्शन; तयारीस वेग, शेतकऱ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार – ॲड. उदयसिंह पाटील

स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ
२६ डिसेंबरपासून कराडला भव्य प्रदर्शन; तयारीस वेग, शेतकऱ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार – ॲड. पाटील
कराड: तात्यासो शिंदे-
शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यंदा २६ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत कराड येथे भरविण्यात येणार आहे. यंदा या प्रदर्शनाचे २० वे वर्ष असून, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या शेती पद्धती आणि यांत्रिकीकरणाच्या संधींचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या प्रदर्शनाच्या तयारीचा भाग म्हणून मंडप उभारणीचा शुभारंभ बुधवार, दि. १७ रोजी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे सभापती पै. शंकरराव ऊर्फ सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, संभाजी चव्हाण, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, जयंतीभाई पटेल, गणपत पाटील, प्रभारी सचिव आबासो पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी संचालक सर्जेराव गुरव व कोयना बँकेचे संचालक संपतराव बडेकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भरविलेले देशातील हे एकमेव प्रदर्शन असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान, आधुनिक शेती पद्धती, एआय (AI) आधारित शेती तंत्रज्ञान, कृषी अवजारे, प्रक्रिया उद्योग व औद्योगिक नवकल्पना यांची माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे. यासाठी शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, आत्मा विभाग तसेच कराड व मलकापूर नगरपरिषदेचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
मंडपाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून बाजार समिती कार्यरत आहे. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार असून शेतीत यांत्रिकीकरणाचा वेग वाढावा, हा प्रमुख उद्देश आहे. यंदा सुमारे ४०० स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंडप व्यवस्थेबाबत माहिती देताना डायनॅमिक इव्हेंटचे मॅनेजर धीरज तिवारी म्हणाले, पिलरलेस डोममध्ये वॉटरप्रूफ, उंचीचा भव्य मंडप उभारण्यात येणार असून, त्यामुळे मंडपात सतत खेळती हवा राहणार आहे. या मंडपात ४०० स्टॉल्ससह स्वतंत्र पशु-पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टॉल्स असतील. शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकरी बांधवांसाठी १०० स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मंडप व परिसरात सर्व आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रा. धनाजी काटकर, रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड, हणमंतराव चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, यशवंत बँकेचे चेअरमन महेशकुमार जाधव, कोयना दूध संघाचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »