
कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे २१ डिसेंबरला ‘कृष्णा मॅरेथॉन’चे भव्य आयोजन
कराड:संतोष शिंदे –
कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे ‘कृष्णा मॅरेथॉन २०२५’ या आरोग्यदायी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन २१ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता कृष्णा विश्व विद्यापीठ परिसरातून सुरू होणार आहे.
आप्पासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत, त्यांच्या सामाजिक कार्याला आणि लोकाभिमुख विचारांना अभिवादन म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे. या मॅरेथॉनमध्ये १० किमी आणि ५ किमी असे दोन गट ठेवण्यात आले असून, नोंदणीसाठी प्रत्येकी ३२० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. सहभागींसाठी वयोगटानुसार स्वतंत्र श्रेणी निर्माण करण्यात आल्या असून, १८ वर्षांखालील तसेच १९ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ वर्षांपुढील अशा पाच वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.
धावपटूंना स्पर्धेचा उत्तम अनुभव मिळावा, यासाठी कृष्णा विद्यापीठामार्फत प्रत्येक स्पर्धकाला मेडल, मॅरेथॉन बिब, टी-शर्ट, फिजिओथेरपी सपोर्ट, वैद्यकीय मदत, नाश्ता, तसेच प्रत्येक दोन किलोमीटरवर हायड्रेशन पॉइंट्स अशा सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. शर्यत पूर्ण करणाऱ्या सर्वांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेसाठी मार्ग व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवकांचे जाळे आणि वैद्यकीय यंत्रणा यांचीही काटेकोर तयारी केली जात आहे.
कृष्णा मॅरेथॉनच्या निमित्ताने आरोग्याकडे वाटचाल करण्याचा आणि समाजमनात सकारात्मकता रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १४ डिसेंबरअखेर ओंकार ढेरे (मोबा. ९०७५२२५६५३) अथवा अभिजीत रैनाक (मोबा. ९७६६७१००९७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






