जीवनशैलीमहाराष्ट्र

‘लाडकी आई-ताई योजना’, ‘लाडकी आजी-आजोबा योजना’ आणि विनामूल्य फिरता दवाखाना, कराडकरांसाठी या तीन महत्त्वपूर्ण योजना जाहीर :विक्रम पावसकर

‘लाडकी आई-ताई योजना’, ‘लाडकी आजी-आजोबा योजना’ आणि विनामूल्य फिरता दवाखाना
कराडकरांसाठी तीन महत्त्वपूर्ण योजना जाहीर :विक्रम पावसकर
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
ज्येष्ठ नगरसेवक विनायक उर्फ अण्णा पावसकर यांच्या पन्नास वर्षांच्या सामाजिक व राजकीय कार्याला अभिवादन म्हणून कराडकरांसाठी तीन महत्त्वपूर्ण योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘लाडकी आई-ताई योजना’, ‘लाडकी आजी-आजोबा योजना’ आणि विनामूल्य फिरता दवाखाना या योजनांची माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ नगरसेवक अण्णा पावसकर, भाजप महिला आघाडी अध्यक्षा सुषमा लोखंडे, हिंदू एकता आंदोलनाचे नाना जीरंगे आणि अजय पावसकर आदी उपस्थित होते.
विक्रम पावसकर म्हणाले, “जनसेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वावर या योजना राबविण्यात येणार आहेत. लाडकी आई-ताई योजना : १५ वर्षांवरील महिलांना ‘सिंदूर हेल्थ कार्ड’ दिले जाणार असून, आरोग्य तपासणी, पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिवाळी साहित्याचा लाभ मिळणार आहे.
लाडकी आजी-आजोबा योजना : ७० वर्षांवरील ज्येष्ठांना ‘अण्णा पावसकर हेल्थ कार्ड’ दिले जाणार असून, दर महिन्याची औषधे विनामूल्य मिळणार आहेत. तसेच निराधार ज्येष्ठांना सकाळ-संध्याकाळ ‘मायेचा जेवणाचा डबा’ पुरवला जाणार आहे.
विनामूल्य फिरता दवाखाना : कराड शहरातील प्रत्येक पेठेत वारांनुसार फिरता दवाखाना आरोग्यसेवा पुरवेल. हिंदवी दहीहंडीचा निधी या उपक्रमासाठी वळविण्यात आला असून, नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. या योजना १ ऑक्टोबरपासून सोमवार पेठेत प्रायोगिक स्वरूपात सुरू होणार असून पुढे संपूर्ण शहरभर विस्तार करण्यात येणार आहेत.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, “अण्णा पावसकरांनी पन्नास वर्षे निष्कलंक व लोकाभिमुख काम केले आहे. समाजकारणाला दिलेले त्यांचे प्राधान्य आज या योजनांमधून प्रकर्षाने दिसून येते. कराडकरांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
अण्णा पावसकर म्हणाले, “मी कधीही पद किंवा पुरस्कारासाठी काम केले नाही. गावाला प्राधान्य देणे, चुकीला विरोध करणे आणि लोकांसाठी काम करणे हेच माझे ध्येय राहिले आहे. गाडगे महाराज कचरामुक्त अभियान, हिंदू एकता आंदोलन किंवा श्रीकृष्ण गजानन मंडळाच्या उपक्रमांतून सदैव समाजसेवा केली. नागरिकांनी या योजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, हीच माझी अपेक्षा आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »