ट्रक-दुचाकी अपघातात दोन युवतींचा जागीच मृत्यू आटके टप्पा येथील घटना; आजारी सहकार्याला बघायला जाताना काळाचा घाला

ट्रक-दुचाकी अपघातात दोन युवतींचा जागीच मृत्यू
आटके टप्पा येथील घटना; आजारी सहकार्याला बघायला जाताना काळाचा घाला
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
आटके (ता. कराड) गावच्या हद्दीत पुणे-बंगलुरु राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पो आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवर असलेल्या दोन्ही युवती आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. या गंभीर अपघातात दोघींच्या जागीच मृत्यू झाला. बुधवारी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
करिष्मा उर्फ प्राजक्ता कृष्णत कळसे (वय २७) रा. रेठरे खुर्द (ता. कराड) व पूजा रामचंद्र कुऱ्हाडे (वय २५) रा. येरवळे (ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवतींची नावे आहेत.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, करिष्मा व पूजा ह्या दोघीही मलकापूर येथील डीमार्टमध्ये नोकरी करत होत्या. बुधवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची कामावरून सुट्टी झाली. त्यांचाच एक सहकारी आजारी असल्याने वाठार येथे त्याला बघण्यासाठी त्या दोघी दुचाकीवरून वाठारला निघाल्या होत्या. आटके टप्पा येथे गाडी आल्यानंतर पाठीमागून आलेला आयशर टेम्पो त्यांच्या दुचाकीला घासला. त्यामध्ये दुचाकीवरील पूजा आणि करिष्मा ह्या दोघी टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. या अपघातात टेम्पोचे मागील चाक दोघींच्या डोक्यावरून गेल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह अपघात विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद रात्री उशिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, आपल्यासोबत काम करणाऱ्या आजारी सहकार्याला बघायला जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या हृदयद्रावक घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.