कराड अर्बनच्या मुंबई येथील स्थलांतरीत मस्जीद बंदर शाखेचे आ.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
कराड अर्बनच्या मुंबई येथील स्थलांतरीत मस्जीद बंदर शाखेचे आ.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
कराड:प्रतिनिधी-
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडच्या मुंबई येथील भोईवाडा शाखेचे रिझव्ह बँकेच्या मान्यतेने मस्जीद बंदर या ठिकाणी मंगळवार दि. २९ ऑगस्ट रोजी स्थलांतर करण्यात आले. नवीन इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या शाखेचे उद्घाटन माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. यावेळी शाखेच्या ठिकाणी सत्यनारायणपूजेचे आयोजन करण्यात आले होते.कराड अर्बन बँकेने ग्रामीण भागात आपले जाळे विस्तृत केले असले तरी त्याच ग्रामीण भागातील मुंबई स्थित लोकांचा गावाकडे आर्थिक संपर्क टिकून राहिला पाहिजे या हेतूने मुंबई शहर व उपनगरामध्ये तीन शाखा सुरू केल्या होत्या. आज या तिन्ही शाखांनी आपला मूळ उद्देश साध्य करत असताना मुंबईतील स्थानिक नागरिकांनासुद्धा आपल्या तत्पर ग्राहकसेवेमुळे आपलेसे केले आहे, असे गौरवोद्वार आ. बाळासाहेब पाटील यांनी यावेळी काढले.कराड शहर व परिसरासह सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील बँकेचे ग्राहक तसेच नागरिक वेगवेगळ्या कारणास्तव मस्जीद बंदर परिसरामध्ये स्थायिक झाले आहेत. यामुळे मस्जीद बंदर येथे कराड अर्बन बँकेस व्यवसाय वाढीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. यावेळी कराड येथील मुंबईस्थित सिकची परिवारातील सदस्य, बँकेचे संचालक, महाव्यवस्थापक,उपहाव्यवस्थापक व सेवक उपस्थित होते. यावेळी शाखेच्या ग्राहकांनी उस्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.