जीवनशैलीव्यवसाय

कराडच्या कृषी प्रदर्शनात येणार सर्वात उंच खिलार बैल प्रदर्शनात यंदा मुख्य आकर्षण ; बैलगाडी शौकिनांसाठी पर्वणी

कराडच्या कृषी प्रदर्शनात येणार सर्वात उंच खिलार बैल
प्रदर्शनात यंदा मुख्य आकर्षण ; बैलगाडी शौकिनांसाठी पर्वणी.
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या शेती उत्पन्न बाजार समिती, कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशू – पक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. विना खांबावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये विविध स्टॉल साकारण्याची हातघाई सुरू आहे. शासन कृषी विभागाने कृषी विभागाच्या मंडपात धुमाळवाडी ( ता. फलटण) या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे. तर या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण सर्वात उंच खिलार बैलाचे असणार आहे. उमराणीचा सोन्या नामक बैल प्रदर्शनात येणार असल्याने सर्वांनाच प्रदर्शनाची आतुरता लागली आहे. हा बैल पाहण्याची बैलगाडी शौकिनांना पर्वणी ठरणार आहे.
माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून १८ वर्षापूर्वी शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू पक्षी प्रदर्शन आकारास आले. गेल्या १८ वर्षापासून खंड न पडता हे प्रदर्शन भरवले जात आहे. यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होवूनही प्रदर्शनास शेतकरी, विक्रेते, महिला बचतगट, अवजारे व यंत्रे आदी विक्रेत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
त्यामुळे प्रदर्शन स्थळावर उभारण्यात आलेले सर्व स्टॉल बुक झाले आहेत. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, सर्व संचालक, कर्मचारी व डायनॅमिक इव्हेंटचे धीरज तिवारी तसेच त्यांची यंत्रणा अथक परिश्रम घेत आहेत.
प्रदर्शनात कृषी विभागाच्यावतीने धुमाळवाडी (ता. फलटण) या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे. यातून शेतकऱ्यांनी शेतीपूरक फळबाग लागवडीकडे वळले पाहिजे, हा हेतू आहे. व शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजनांची जागृती व्हावी, हा उद्देश ठेवून ही प्रतिकृती साकारली आहे. तर यंदा प्रदर्शनात सर्वात उंच बैलाचे मुख्य आकर्षण आहे.
उमराणीचा सोन्या नामक हा खिलार जातीचा बैल आहे. हा बैल खिल्लार व वळू क्षेत्रातील सर्वात उंचीचा व सर्वात जास्त लांबीचा जातीवंत वळू आहे. त्याची उंची 6.5 फूट व लांबी 9.5 फूट आहे. दरमहा त्याची कमाई अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »