जीवनशैलीश्रद्धा

मलकापूरच्या रूपाने आधुनिक नगर उभा राहतंय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; स्व. भास्करराव शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम

मलकापूरच्या रूपाने आधुनिक नगर उभा राहतंय
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; स्व. भास्करराव शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
बहुजन समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, समाजाच्या वाढीमध्ये व प्रगतीमध्ये हातभार लागावा या उद्देशाने स्वर्गीय भास्करराव शिंदे यांनी शिक्षण संस्थेची उभारणी केली. या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे. त्याचबरोबर मलकापूरच्या विकासाचा ध्यास घेऊन भास्करराव शिंदे यांनी कार्य केले. त्यांच्या विकासाचा व कार्याचा वारसा मनोहर शिंदे पुढे चालवत आहेत. आजवर राबवलेल्या विविध योजना आणि उपक्रमांमुळे मलकापूरच्या रूपाने आधुनिक नगर उभा राहत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
स्वा. सै. स्वर्गीय भास्करराव शिंदे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मलकापूर येथील श्री लक्ष्मी देवी शिक्षण संस्थेच्या वतीने आगाशिवनगरमधील शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील होते. यावेळी मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण, नीलम येडगे, अजितराव पाटील चिखलीकर, प्रताप कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. भास्करराव शिंदे यांना मायफ्रेंड नावाने ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण संस्थेच्या रूपाने लावलेले रोपट्याचा आज वटवृक्षामध्ये रूपांतर होताना दिसत आहे. या शिक्षण संस्थेमध्ये मलकापूर, आगाशिवनगरसह ढेबेवाडी परिसरातील हजारो मुले शिक्षण घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मुलांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्या देशातील विश्वविद्यालयांमधून अपेक्षित गुणवत्ता प्राप्त शिक्षक व संशोधन होताना दिसत नाही. तसेच शिक्षण संस्था व शासन पातळीवरही त्या दृष्टीने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. असे असले तरी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर आपल्या देशामध्ये भरपूर काम झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी व भविष्यात मुलांना चांगले ज्ञान मिळावे या दृष्टीने शिक्षण संस्थांनी प्रयत्न करावेत.
आपल्या देशातील विश्वविद्यालये म्हणजे डिग्री देणारे कारखाने आहेत. जगाच्या पाठीवरती ज्ञानात भर घालणारे निर्णय आपल्या या विश्वविद्यायलांमधून घेतले जात नाहीत. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. भास्करराव शिंदे यांनी शिक्षण संस्था उभा करून अनेक मुलांना ज्ञानाची कवाडे खुली करून दिली. मलकापूर व कराड शहर हे भविष्यात दुहेरी शहर म्हणून पुढे येईल. त्यामुळे येत्या कालावधीमध्ये मलकापूरला आणखी वाढण्यास मदत होणार आहे. मलकापूरमध्ये राबवण्यात आलेल्या विविध योजना व अनेक कल्पक उपक्रमांमुळे मलकापूरचे नाव जगाच्या नकाशावरती पोहोचवले आहे मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या योजना राबवल्या जात आहेत. स्वर्गीय भास्करराव शिंदे यांनी मलकापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून कोणालाही भेटण्यामध्ये कधीही कमीपणा मानला नाही. आपले काम व्हावे मलकापूर व परिसरातील लोकांचा विकास व्हावा ही दूरदृष्टी त्यांनी नेहमी ठेवली होती. हातात घेतलेले काम ते कधीही अर्धवट न सोडता पूर्ण करत होते. त्यांच्याच विचारांचा व मलकापूरच्या विकासाचा वारसा मनोहर शिंदे सक्षमपणे पुढे चालवित आहेत. जागतिक ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषा गरजेची आहे. आपल्या देशातील विश्वविद्यालयांचा दर्जा अत्यंत सुमार आहे. या विश्व विद्यालयांमध्ये संशोधन होत नाही की अपेक्षित ज्ञान मिळत नाही. जगाच्या पाठीवर नवीन ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषा येणे महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टी महत्त्वाच्या असून त्याकडे आपल्या देशात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य व शिक्षण ही दोन क्षेत्र मजबूत होणे गरजेचे आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
श्रीनिवास पाटील म्हणाले, मायफ्रेंड स्वर्गीय भास्करराव शिंदे यांनी मलकापूरच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. येथील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्थेची उभारणी केली. त्या शिक्षण संस्थेमध्ये आज हजारो मुले शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये आजवर झालेल्या अनेक मुख्यमंत्र्यांमध्ये सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला सर्वात जास्त मुख्यमंत्री दिले आहेत. भास्करराव शिंदे यांच्यामुळे मलकापूरच्या. त्यावेळी भास्करराव शिंदे यांनी सुरू केलेली ही शिक्षण संस्था मोठ्या स्वरूपात नावारूपाला आलेली दिसून येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »