बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल उत्तरेतील कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन; जनता यशवंत विचारांची पाठराखण करेल : आ. बाळासाहेब पाटील
बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
उत्तरेतील कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन; जनता यशवंत विचारांची पाठराखण करेल : आ. बाळासाहेब पाटील
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
त्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून दत्त चौकापर्यंत समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढली. या रॅलीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. शिवतीर्थ चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित जनसमुदाय लिबर्टी मैदान येथे होणाऱ्या सभास्थळी रवाना झाला.
तदनंतर येथील कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमांची संवाद साधताना ते म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने अनेक वर्ष मला सहकार्य केले आहे. याठिकाणी विकासावर आधारित राजकारण करण्यावर आपला नेहमीच भर राहिला आहे. सहकार व पणनमंत्री पदाच्या कार्यकाळात आपण मतदारसंघात अनेक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पाठराखण करणारा जिल्हा आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही आपण यशवंतराव चव्हाण, आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचारांनुसारच राजकीय वाटचाल करत आहोत. मतदारसंघात विरोधकांकडून जातीवादी विचार रुजविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, ही विचारांची लढाई असून येथील सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, दत्त चौकामध्ये आ. बाळासाहेब पाटील आणि भाजपचे नेते मनोज घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांचा समूह समोरासमोर आल्याने या ठिकाणी किरकोळ वादावादी झाली. त्यामुळे काहीकाळ तलावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.