जीवनशैलीमहाराष्ट्र

पृथ्वीराज चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल साधेपणाने भरला अर्ज; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन, दक्षिणेत दोन विचारांची लढाई : पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल
साधेपणाने भरला अर्ज; यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन, दक्षिणेत दोन विचारांची लढाई : पृथ्वीराज चव्हाण
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
त्यानंतर श्री. चव्हाण यांनी कराड येथील प्रशासकीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील-उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजीत मोहिते, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई थोरवडे, मलकापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा निलमताई येडगे, मराठा महासंघ सातारा जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली जाधव, ओबीसी संघटना राज्य अध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा गितांजली थोरात, सातारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, माजी सभापती रमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ही विधानसभा निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या निवडणुकीत कराडकर आपल्याला आशीर्वाद देतील. सध्या बाजारपेठेत मंदीचे वातावरण असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक, व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी आपण कोणत्याही प्रकारे शक्तिप्रदर्शन न करता अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.
महायुती सरकारचा समाचार घेताना ते म्हणाले, एकीकडे राज्य सरकार लाडक्या बहिणींना 1500 रुपये देते. तर दुसरीकडे नगरसारख्या ठिकाणी महिलांचा अपमान केल्याची निंदनीय घटना घडली आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. याबाबत भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. त्यांना असल्या कृत्यांबाबत जनताच धडा शिकवेल.
कराड दक्षिणमधील उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, कराड दक्षिणसाठी आतापर्यंत एकूण दहा अर्ज दाखल झाले असले, तरी या ठिकाणी दोन विचारांची लढाई आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कराडमध्ये जातीवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ द्यायचा नाही, यासाठीचे प्रयत्न आहेत. येथील जनता सुज्ञ असून ती महाविकास आघाडीला बहुमत देईल, असं विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या गद्दारीबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक परंपरा आहे. परंतु, काहींनी अभद्र युती केल्यामुळे या संस्कृतीला डाग लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि समविचारी राजकीय पक्ष एकत्र मिळून हा डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न करतील. यात जनताच यश देईल.
दरम्यान, यापूर्वी गुरुवार, दि. 24 रोजी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते इंद्रजित गुजर यांच्यासह अन्य आठ जणांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »