प्रदूषण व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेतील 1169 विद्यार्थ्यांचा सहभाग
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था मलकापूर व विज्ञान प्रबोधिनी कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदराव चव्हाण विद्यालयाच्या (मलकापूर) प्रांगणात 1169 विद्यार्थ्यांनी फटाके व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली.
संस्थेचे सचिव, शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या संकल्पनेतून गेल्या सोळा वर्षांपासून पर्यावरण पूरक उपक्रम राबवला जात आहे. याही वर्षी फटाके मुक्त व प्रदूषण विरहित दीपावली साजरी करण्याचे सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना संस्थेच्या वतीने त्यांनी आवाहन केले. श्री मळाई ग्रुप विविधांगी समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतो.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले, पर्यावरण पूरक पद्धतीने दिवाळी साजरी करणे केवळ पर्यावरणासाठीच फायदेशीर नाही, तर सणाची भावना देखील समृद्ध करत असल्याने ती पर्यावरणपूरक दिवाळी बनते. शाश्वत पद्धतींचा स्वीकार करून आपण पर्यावरण पूरक दिवाळी कशी साजरी करू शकतो, हे जाणून घेत आपण पृथ्वीचा मान ठेवणारी आणि भावी पिढ्यांसाठी सकारात्मक वारसा देणारी आनंदमय आणि अर्थपूर्ण दिवाळी साजरी करू शकतो. या उपक्रमातून निरोगी आणि हरित जगासाठी हातभार लावण्याची प्रतिज्ञा करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
फटाके मुक्त व प्रदूषण मुक्त दीपावली या विषयी बोलताना पुढे ते म्हणाले, जीवनाचा आनंद घेण्यासाठी विचारांच्या देवाणघेवाणीतून प्रदूषणाने माणसावर होणारे आघात याबाबत अधिक विचार समाज बांधवांमध्ये व्हावा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विज्ञान प्रबोधिनीचे सहसचिव एम. व्ही. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना फटाके व प्रदूषण मुक्त दीपावलीची प्रतिज्ञा दिली. यावेळी विद्यालयाचे उपमुख्यध्यापक ए. बी. थोरात, पर्यवेक्षक बी. जी. बुरुंगले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. दरम्यान, विद्यालयातील शिक्षकांच्या उपस्थितीत पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त दीपावली पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांनी सर्वांना प्रबोधन करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. ए. एस. कुंभार, सूत्रसंचालन शरद तांबवेकर, बी. जी. बुरुंगले यांनी आभार मानले.