राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल पृथ्वीराज चव्हाण; 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा मेळाव्यात निर्धार
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल
पृथ्वीराज चव्हाण; 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा मेळाव्यात निर्धार
कराड :ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कर्नाटक व आंध्रमध्ये काँग्रेसने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहा दोन हजार रुपये दिले. महायुतीने महाराष्ट्रात त्याच योजनेचे नाव बदलून लाडकी बहिण केले. परंतु, ही योजना टिकण्यासाठी त्यांनी कोणताही कायदा केलेला नाही. मात्र, राज्यात आता महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून महिलांना दीड ऐवजी दोन हजार रुपये, मोफत प्रवास, मुलींना सायकल आणि अन्य योजनांचा लाभही देण्यात येणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराड येथे कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा, तसेच पुढील 30 दिवस पृथ्वीराजबाबांच्या विजयासाठी देण्याचा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
यावेळी ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील-चिखलीकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा गितांजली थोरात आदींची प्रमुख उपस्थित होती.
आ. चव्हाण म्हणाले, येथील जनतेने मला 1991 ला आशीर्वाद दिल्याने माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघासाठी तब्बल 1600 कोटींची कामे केली. आता कराड तालुक्यात स्थानिक युवकांना याच ठिकाणी रोजगार उपलब्धीसाठी आयटी हबची निर्मिती करण्याचा मानस असून येथील जनतेने संधी दिल्यास कराड दक्षिणचा ‘न भूतो न भविष्यती’ असा विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
उदयसिंह पाटील म्हणाले, देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवून, समाजात तेढ निर्माण करून यशवंतराव चव्हाण यांनी रचलेल्या पुरोगामी महाराष्ट्राचा पाया उध्वस्त करण्याचे काम काही प्रवृत्ती करत आहेत. कराड दक्षिणमध्येही हे काम सुरू आहे. हे आपण ओळखले पाहिजे. विलासकाकांनी नेहमी समाज, संघटना हिताचे काम केले. त्यांनी अनेकांना मदत केली. परंतु, सत्तेत गेल्यावर त्यांच्या रक्तात सरंजामशाही, भांडवलशाही भिनली. वाम मार्गाने मिळालेल्या पैशातून त्यांना माणसं, सत्ता विकत घ्यायची असल्याचा आरोपीही त्यांनी कोणाचेही नाव न घेता केला.
प्रास्ताविक कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. यावेळी बंडानाना जगताप, भानुदास माळी, फारूक पटवेकर, आबा सूर्यवंशी, अॅड. अमित जाधव, शिवराज मोरे, प्रा. धनाजी काटकर, अजितराव पाटील-चिखलीकर यांची भाषणे झाली. दिग्विजी पाटील यांनी आभार मानले. या मेळाव्यास कराड दक्षिणमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह, नागरिक, महिलांची मोठी उपस्थिती होती.
चौकट :
काकांच्या विचारांचा आणि संघटनेचा वारसा जपणार
आज अनेकजण विचारतात, या निवडणुकीत रयत संघटनेची भूमिका काय राहणार आहे. खरेतर काका-बाबा यांच्यात वैचारिक मतभेद होते, मनभेद नव्हते. परंतु, काहींकडून याचे भांडवल केले जात आहे. मात्र, आपणही काकांकडून मिळालेल्या वैचारिक वारशाची प्रतारणा होऊ देणार नाही. रयत संघटना शब्दाला बांधील आहे. राज्यात परिवर्तन अटळ असून यामध्ये कराड दक्षिणचा सहभाग होण्यासाठी पृथ्वीराजबाबांना सर्वांनी साथ द्या, असे आवाहनही उदयसिंह पाटील यांनी यावेळी केले.