कराड दक्षिणमध्ये स्थिर सर्वेक्षण पथके सज्ज अतुल म्हेत्रे; उंडाळे, आचारसंहिता कालावधीपर्यंत 24 तास पथके राहणार तैनात
कराड दक्षिणमध्ये स्थिर सर्वेक्षण पथके सज्ज
अतुल म्हेत्रे; उंडाळे, आचारसंहिता कालावधीपर्यंत 24 तास पथके राहणार तैनात
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
269 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्वेक्षण पथके सज्ज करण्यात आली आहेत.
त्यामध्ये तालुक्यातील उंडाळे, कोकरूड रोड, मालखेड फाटा व शेणोली घाट आदी ठिकाणी सोमवारपासून आचारसंहिता कालावधीपर्यंत 24 तास ही पथके तैनात राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
ते म्हणाले, कराड तालुक्यात सर्व शक्यता गृहीत धरून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये, या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अधिपत्याखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, निवडणूक नायब तहसीलदार युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण तालुक्यात बाहेरून प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अवैध दारू, पैसे, शस्त्रसाठा येण्याची दाट शक्यता लक्षात घेता वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. निवडणुकीमध्ये गोंधळ, तसेच वाईट कृत्य होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या वाईट कृत्यांना आळा घालण्यासाठी, तसेच मतदान सुरळीत पार पडण्यासाठी तालुक्यात स्थिर सर्वेक्षण पथके सज्ज करण्यात आली आहेत.