आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणून केंद्राची मंजुरी कराड शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करून, लाडू वाटप
आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश, मराठी भाषेला अभिजात दर्जा म्हणून केंद्राची मंजुरी
कराड शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करून, लाडू वाटप
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याने हा क्षण मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण ठरलेला आहे. यानिमित्त माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना २०१२ साली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत समिती गठीत केली होती ज्याचा अहवाल ११ जुलै २०१४ रोजी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. आज अखेर त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे याचा पाठपुरावा करणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी कराड शहरात दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करून लाडू वाटप केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा गीतांजली थोरात, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज मोरे, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सुनील बरिदे, गणेश गायकवाड, दत्तात्रय सूर्यवंशी, युवक काँगेसचे अनिल माळी, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, जितेंद्र यादव, अबरार मुजावर, देवदास माने आदीसह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले कि, माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पाठारे समिती गठीत केली होती. समितीने आपला अहवाल बनविला व राज्य सरकारने तो केंद्राकडे सादर केला. आज त्या अहवालावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मिळाला आहे.
माननीय पृथ्वीराज चव्हाण तथा बाबांचे कार्य नेहमीच आदर्श राहीले आहे. त्यांनी प्राकृत भाषा संगणकावर आणण्यासाठी फार मोठे संशोधन केले. स्व. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी मराठी भाषा संगणकावर आणली. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा विकसित व्हावी, मराठीचा गौरव वाढावा यासाठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्याच सातारच्या भूमितील माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या भूमीचा गौरव आहे. आज मराठी भाषेला केंद्राने अभिजात दर्जा देऊन आपले सोपस्कार पार पाडले आहेत.
तसेच यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष धनाजी काटकर म्हणाले कि, केंद्रात १० वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने याचे श्रेय घेण्याचे कारण नाही. राज्यात व केंद्रात सत्ता असताना त्यांना मराठी भाषेचे प्रेम कधी दाटून आले नाही. आज केवळ सत्ता जाणार या धास्तीने त्यांना मराठी भाषा आठवली व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे पुण्य केले. त्यामुळे मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला आहे याचे पूर्ण श्रेय माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनाच मिळते व याचा आम्हा सर्वाना अभिमान आहे.