कराडमध्ये मद्यधुंद चालकाचा कहर माजी नगरसेवकासह दोघांना दिली धडक; पळ काढताना दुभाजकावर आदळून कार पलटी, दोघे गंभीर, अक्षय संभाजी शेवाळे असे चालकाचे नाव

कराडमध्ये मद्यधुंद चालकाचा कहर
माजी नगरसेवकासह दोघांना दिली धडक; पळ काढताना दुभाजकावर आदळून कार पलटी, दोघे गंभीर:अक्षय संभाजी शेवाळे असे चालकाचे नाव
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
शहरात सोमवारी उशिरा रात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या बेदरकार वाहनचालकाने माजी नगरसेवकासह दोन जणांना जोरदार धडक दिली, त्यात ते देत गंभीर जखमी झाले. जखमींपैकी माजी नगरसेवकावर पुण्यातील खासगी रुग्णालयात, तर एका महिलेवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सिद्धार्थ महादेव थोरवडे (रा. बुधवार पेठ, कराड) आणि सुरय्या इब्राहिम शिकलगार (रा. मंगळवार पेठ, कराड) हे जखमी झाले आहेत. तर अक्षय संभाजी शेवाळे (रा. शेवाळेवाडी, उंडाळे) असे मद्यधुंद चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास अक्षय शेवाळे हा भरधाव वेगात कार चालवत शहरात फिरत होता. बुधवार पेठ व मंगळवार पेठ परिसरात त्याने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात थोरवडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतरही चालकाने कार न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तत्काळ पाठलाग केला. अखेर मंगळवार पेठेतील कन्या शाळा परिसरात कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकावर आदळून पलटी झाली. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अपघातातील एका जखमी व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या नातेवाईकाला अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






