कराड मध्ये गांजा विक्री करणारे दोघे जेरबंद पोलीस उप अधीक्षक पथक व कराड शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; 60 हजार रूपये किमतीचा गांजा जप्त

कराड मध्ये गांजा विक्री करणारे दोघे जेरबंद
पोलीस उप अधीक्षक पथक व कराड शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; 60 हजार रूपये किमतीचा गांजा जप्त
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
शहरात गांजा विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलीस उपअधीक्षक पथक व कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
बुधवार पेठ येथील प्रभात टॉकीज जवळ ही कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांच्याकडून सुमारे 60 हजार रूपये किमतीचा 2 किलो 300 ग्रँम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
शुभम उर्फ सोन्या दिलीप पवार (वय 23) रा. नगरपालिकेजवळ बुधवार पेठ, कराड) व जगन्नाथ महिपती भोसले (वय 40) रा. प्रभात टॉकीज शेजारी बुधवार पेठ, कराड अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहर व परिसरात अंमली पदार्थ, तसेच गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराकडून पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांना बुधवार पेठ येथे गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, क्राईमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलीस उपअधीक्षक पथक व कराड शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री बुधवार पेठेतील प्रभात टॉकीजजवळील नदाफ नावाच्या इसमाच्या बिल्डींगमध्ये छापा टाकला असता तेथे शुभम उर्फ सोन्या पवार व जगन्नाथ भोसले एका खोलीत मिळून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांची अंगझडती घेऊन खोलीत तपास केला असता खोलीमध्ये सुमारे 60 हजार रूपये किमतीचा दोन किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली क्राईमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, डीवायएसपी पथकाचे सागर बर्गे, प्रविण पवार, असिफ जामदार, मयूर देशमुख, संताजी जाधव, डीबीचे दिग्विजय सांडगे यांनी केली.






