जीवनशैली

कराडमध्ये मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज सकाळी १० वाजता सुरुवात:सायंकाळी पाचपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार: अशी होणार मतमोजणी

कराडमध्ये मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
सकाळी १० वाजता सुरुवात:सायंकाळी पाचपर्यंत सर्व निकाल जाहीर होणार: अशी होणार मतमोजणी
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि वेळेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतमोजणीच्या कामासाठी एकूण २३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणीसाठी २४ टेबल तर टपाली मतमोजणीसाठी १२ स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. टपाली मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार असून त्यानंतर १०.१५ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ होईल.
प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक आणि एक चतुर्थश्रेणी कर्मचारी अशी तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे. एकाच वेळी १२ गट व त्याअंतर्गत असलेल्या गणांची मतमोजणी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.
गटनिहाय मतमोजणी फेऱ्यांमध्ये पाल गटासाठी २५, उंब्रज २२, मसूर २३, कोपर्डे-हवेली २०, सैदापूर २०, वारुंजी १९, तांबवे २०, विंग १९, कार्वे २१, रेठरे बुद्रुक २३, काले २२ आणि येळगाव गटासाठी २४ फेऱ्या होणार आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व गटांचे अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतमोजणी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना रविवारी दुपारी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अचूकता, दक्षता व पूर्ण पारदर्शकता राखून काम करण्याच्या स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »