अंतवडी (ता. कराड) येथील रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात रक्षक प्रतिष्ठानने पुकारलेले सामूहिक आत्मदहन आंदोलन तूर्त स्थगित

‘रक्षक’ चे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित
शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेपर्यंत काम थांबवणार; बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
अंतवडी (ता. कराड) येथील रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात रक्षक प्रतिष्ठानने पुकारलेले सामूहिक आत्मदहन आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. बांधकाम विभागाने जोपर्यंत अंतवडी येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मायणी ते निसरे फाटा या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी पूर्वीच आठ मीटर भूसंपादन करण्यात आले असून तिथे रस्ता तयार आहे. मात्र, अंतवडी गावच्या हद्दीत सध्याच्या आठ मीटर रस्त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या मालकीची अतिरिक्त जमीन कोणतीही परवानगी न घेता, कायदेशीर भूसंपादन न करता बळकावली जात असल्याचा आरोप रक्षक प्रतिष्ठानने केला आहे. याबाबत कोणतीही आर्थिक भरपाई शासनाकडून देण्यात आलेली नाही. या गंभीर प्रश्नावर १३ जानेवारी रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या वेळी पुढील सात दिवसांत आठ मीटरच्या अधिग्रणाचे मोजमाप करून अधिकृत नोंद करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. मात्र, त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. उलट, मसूर रेल्वे पुलापासून ते वडोली भिकेश्वर दरम्यान कंत्राटदाराने जबरदस्तीने बांधकाम सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या अन्यायाविरोधात रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी बाधित शेतकऱ्यांसह २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तातडीने रक्षक प्रतिष्ठान ल, शेतकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. २६ जानेवारी रोजी सकाळी पार पडलेल्या या बैठकीला बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. धुमाळ, श्री. कोकरे, संबंधित ठेकेदार आदी उपस्थित होते.
या बैठकीत मनोज माळी यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. जोपर्यंत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि शामगाव घाट व उंब्रज हद्दीतील अनधिकृत काम थांबत नाही, तोपर्यंत रस्ता होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला. अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने बांधकाम विभागाने काहिशीबनमती भूमिका घेतली. यावेळी अंतवडी येथील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत संबंधित रस्त्याचे काम सुरू केले जाणार नाही,” असे लेखी पत्र बांधकाम विभागाने रक्षक प्रतिष्ठानला दिले.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने २६ जानेवारी रोजी होणारे सामूहिक आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय मनोज माळी यांनी जाहीर केला. मात्र, दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न सुटला नाही, तर पुन्हा तीव्र संघर्ष छेडला जाईल, असा इशाराही रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे.
शामगाव घाट ते उंब्रज दरम्यान शासनाकडून रस्त्याचे अनधिकृत व नियमबाह्य बांधकाम सुरू आहे. यामध्ये अंतवडी येथिल शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे व राक्षक प्रतिष्ठानच्या पुढाकारामुळे येथील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर काम बंद ठेवण्याचा लेखी आश्वासन मिळाले आहे. मात्र रिसवड ते वडोली भिकेश्वर यादरम्यान शासन गतीने काम करत आहे. येथील शेतकऱ्यांना बरोबर घेत लवकरच मोठे जन आंदोलन उभा करून प्रशासनाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मायणी ते निसरे या रस्त्यादरम्यान कराड तालुक्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत रक्षक प्रतिष्ठान पूर्ण ताकतीनिशीे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून प्रशासनाशी संघर्ष करण्याची आमची भूमिका राहणार आहे.
मनोज माळी
जिल्हाध्यक्ष, रक्षक प्रतिष्ठान, सातारा






