गुन्हा

कराड परिसरात एम.डी. ड्रग्ज निर्मितीचा संशय, विशेष पथकाची धडक कारवाई

कराड परिसरात एम.डी. ड्रग्ज निर्मितीचा संशय, विशेष पथकाची धडक कारवाई
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळसण (पाचुपतेवाडी) परिसरात एम.डी. ड्रग्ज अमली पदार्थ तयार करणारी गुप्त फॅक्टरी कार्यरत असल्याच्या संशयावरून जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाने मोठी कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका जुन्या गुन्हेगाराचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित संशयिताने बिहारमधील काही व्यक्तींना हाताशी धरून तालुक्याच्या ग्रामीण भागातील तुळसण (पाचुपतेवाडी) परिसरात अत्यंत गोपनीय पद्धतीने अमली पदार्थांची निर्मिती सुरू केली होती. फॅक्टरीचे ठिकाण, हालचाली आणि संपर्क याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने ही बाब दीर्घकाळ कोणाच्या लक्षात आली नव्हती. मात्र, जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाला याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अचानक छापा टाकत कारवाई केली. ही कारवाई पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली असून, स्थानिक पोलिसांना याची पूर्वकल्पना नव्हती, हे विशेष बाब म्हणून पुढे येत आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी कराड शहरातील एका नामवंत मद्य व्यावसायिकाच्या मुलाचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध उघडकीस आला होता. त्या घटनेशी सदर प्रकरणाचा काही संबंध आहे का?, याचीही तपास यंत्रणा पडताळणी करत आहे.
या कारवाईमुळे कराड तालुक्यात पुन्हा एकदा एम.डी. ड्रग्जसारख्या घातक अमली पदार्थांचा काळाबाजार सक्रिय असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी व्याप्ती आणि जबाबदार व्यक्ती स्पष्ट होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »