जीवनशैली

भाजपमधील निष्ठावंतांवर अन्याय, आयारामांना संधी ॲड. महादेव साळुंखे; अन्यायाविरोधात लढाई, धनुष्यबाणावरून उंब्रज गटातून लढणार निवडणूक

भाजपमधील निष्ठावंतांवर अन्याय, आयारामांना संधी
ॲड. महादेव साळुंखे; अन्यायाविरोधात लढाई, धनुष्यबाणावरून उंब्रज गटातून लढणार निवडणूक
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
भारतीय जनता पक्षात गेली पंधरा वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असून, आयत्यावेळी पक्षात प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिली जात असल्याने भाजपमधील जुने कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. या अन्यायकारक धोरणांविरोधात उंब्रज जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार ॲड. महादेव साळुंखे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. साळुंखे यांनी, भाजपच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेवर थेट प्रश्न उपस्थित केले. उत्तर कराड विधानसभा मतदारसंघातील पक्षीय नेतृत्वाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे आपण नाईलाजाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरून उंब्रज जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी तळबीड गणातील शिवसेनेचे उमेदवार दिनेश घाडगे, सुशांत इनामदार, शिवाजी भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲड. साळुंखे म्हणाले, २०१० पासून मी भाजपसाठी सातत्याने काम करत आहे. २०१२ साली जिल्हा परिषद निवडणूक लढवली असून, त्यावेळी १,४७१ मते मिळाली होती. प्रतिकूल परिस्थितीतही पक्ष सोडला नाही. उंब्रज येथे तालुक्यातील भाजपचे पहिले कार्यालय सुरू केले. विरोधी सरकारच्या काळात अडीच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. मात्र आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच तिकीट नाकारले जात आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.
ते म्हणाले, कराड उत्तरमध्ये भाजप पक्षवाढीसाठी रामकृष्ण वेताळ, दीपाली खोत, प्रमोद गायकवाड, नाना पिसाळ यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. मात्र अशा धडाडीच्या कार्यकर्त्यांनाही यंदा डावलण्यात आले. आम्ही पद, सत्ता किंवा वैयक्तिक लाभासाठी काम केले नाही. केवळ पक्षचिन्ह आणि विचारधारेसाठी काम केले. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आयारामांना संधी देत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतला जात आहे.
भाजपमधील अंतर्गत लोकशाही संपुष्टात आल्याचा आरोप करताना ॲड. साळुंखे म्हणाले, पूर्वी उमेदवारी ठरवताना मंडलाध्यक्ष, तालुकाध्यक्षांचे मत महत्त्वाचे मानले जात होते. मात्र आता सर्व अधिकार स्थानिक आमदारांकडे केंद्रीत झाल्याने पक्षातील समन्वय व शिस्त ढासळली आहे. यंदा उंब्रज जिल्हा परिषद गटात खुले आरक्षण असताना ही संधी खऱ्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळायला हवी होती. मात्र तीही हिरावून घेतली गेली. आज सत्ता आहे म्हणून अवघ्या दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून आलेल्यांना तिकीट दिले जात आहे. मग १२ ते १५ वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांचे काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि मग स्वतः या तत्त्वावर मी आजवर काम केले आहे. अन्याय सहन करणे हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे समविचारी पक्षात प्रवेश करून ही लढाई लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करत ॲड. महादेव साळुंखे यांनी, उंब्रज जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या (शिंदे गट) धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »