मलकापूर उपनगराध्यक्षपदी मनोहर शिंदे बिनविरोध स्वीकृत नगरसेवकपदी सुहास कदम व ॲड. अमीरखान मुल्ला; समर्थकांत जल्लोष

मलकापूर उपनगराध्यक्षपदी मनोहर शिंदे बिनविरोध
स्वीकृत नगरसेवकपदी सुहास कदम व ॲड. अमीरखान मुल्ला; समर्थकांत जल्लोष
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
:मलकापूर नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवत इतिहास घडवला. त्यानंतर आज गुरुवारी मलकापूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी मनोहर भास्करराव शिंदे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकपदी सुहास राजाराम कदम व ॲड. अमीरखान आदम मुल्ला यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत करण्यात आल्या.
या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष तेजस सोनवले होते. पिठासन अधिकारी म्हणून त्यांनी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची अधिकृत घोषणा केली. यावेळी मुख्याधिकारी कपिल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपनगराध्यक्षपदासाठी मनोहर शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सत्ताधारी नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नगराध्यक्ष तेजस सोनवले व मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर स्वीकृत नगरसेवकपदासाठी सुहास कदम व ॲड. अमीरखान मुल्ला यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
निवडीची घोषणा होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.
मलकापूर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नगराध्यक्षपदासह १९ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या यशानंतर उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
निवडीनंतर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, तसेच स्वीकृत नगरसेवक सुहास कदम व ॲड. अमीरखान मुल्ला यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, डॉ. सुरेश भोसले व विनायक भोसले यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.






