आळसुंदचा ‘टोमॅटो’, तांबव्याची ‘वांगी’ लई भारी पालेभाजी स्पर्धेत कपिलची ‘मेथी’, वजरोशीची ‘चाकवत’ अव्वल

आळसुंदचा ‘टोमॅटो’, तांबव्याची ‘वांगी’ लई भारी
पालेभाजी स्पर्धेत कपिलची ‘मेथी’, वजरोशीची ‘चाकवत’ अव्वल
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात मंगळवारी झालेल्या फळभाजी व पालेभाजी स्पर्धेत आळसुंदचा ‘टोमॅटो’ आणि कराड तालुक्यातील तांबव्याची ‘वांगी’ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
फळभाजी गटात आळसुंद (ता. खानापूर) येथील पल्लवी अशोक जाधव यांच्या ‘टोमॅटो’ला आणि तांबवे (ता. कराड) येथील आदर्श पंढरीनाथ पाटील यांच्या ‘वांगी’ला विभागून प्रथम क्रमांक मिळाला. कार्वे (ता. कराड) येथील प्रत्येक श्रीकांत जानुगडे यांच्या ‘मिरची’ला आणि दिवशी बुद्रुक (ता. पाटण) येथील अर्चना अशोक नांगरे यांच्या ‘पावटा’ला तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच लवणमाची (ता. वाळवा) येथील विकास सर्जेराव माळी यांच्या ‘फ्लॉवर’ व गोंदी (ता. कराड) येथील लालासाहेब आनंदराव पवार यांच्या ‘चेरी टोमॅटो’ला विभागून तृतीय क्रमांक मिळाला.
पालेभाजी स्पर्धेत कपिल (ता. कराड) येथील इंदुताई बबन जाधव यांच्या ‘मेथी’ला आणि वजरोशी (ता. पाटण) येथील विनायक सयाजी डफळे यांच्या ‘चाकवत’ला विभागून प्रथम क्रमांक मिळाला. तारळे (ता. पाटण) येथील दीपक लालासो जाधव यांच्या ‘कोथिंबीर’ला आणि कपिल येथील त्रिशला हणमंत जाधव यांच्या ‘शेपू’ला द्वितीय क्रमांक देण्यात आला. तर कपिल येथील आरोही सुहास जाधव यांच्या ‘लाल माठ’ व पांढरवाडी (ता. पाटण) येथील चंद्रकांत रघुनाथ पवार यांच्या ‘मेथी’ला तृतीय क्रमांक मिळाला.
करवडी येथील आनंदा आप्पा पिसाळ यांच्या ‘झुकेनी’, आनेवाडी (ता. कराड) येथील अरुणा श्रीरंग फरांदे यांच्या ‘काशीफळ भोपळा’, विद्यमान शेती (ता. कराड) येथील रोहिणी दत्तात्रय जाधव यांच्या ‘कांदापात’ आणि नांदगाव (ता. कराड) येथील नेचर हायड्रोपोनिक्स यांच्या ‘ग्रीन लोलो’ (लेट्यूस) या उत्पादनांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले.
विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००१, ३००१ व २००१ रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उत्तेजनार्थ विजेत्यांचाही यथोचित सन्मान केला जाणार आहे.






