जीवनशैली

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चे लाईव्ह मॉडेल; ग्रामविकासाची सजीव मांडणी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चे लाईव्ह मॉडेल; ग्रामविकासाची सजीव मांडणी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कराड येथे बाजार समिती, जिल्हा परिषद व शासनाच्या कृषी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनामध्ये सातारा जिल्हा परिषद कृषी विभागाकडून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’चे सविस्तर लाईव्ह मॉडेल उभारण्यात आले आहे. या लाईव्ह मॉडेलमुळे शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाची प्रत्यक्ष व सजीव माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत असून या उपक्रमाला शेतकरी, ग्रामस्थ व भेट देणाऱ्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या लाईव्ह मॉडेलमध्ये ग्रामपंचायत भवन, शेतकरी उत्पादक कंपन्या, बाजार गाळे, नाविन्यपूर्ण उपक्रम, बायोगॅस प्रकल्प, जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजना, मुक्त संचार गोठा, बिहार पॅटर्न वृक्ष लागवड, बंधारे, ठिबक सिंचन, गटशेती, पाणंद रस्ते आदी ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती प्रतिकृतीच्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. ग्रामपातळीवर राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांचा परस्पर संबंध, त्यांचे परिणाम आणि लोकसहभागातून घडणारा विकास या मॉडेलमधून स्पष्टपणे उलगडण्यात आला आहे.
या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या लाईव्ह मॉडेलसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सातारा जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, सातारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्नी. देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच कराड पंचायत समितीचे कराड गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रसाद खेडेकर, कराड पंचायत समितीचे कृषी अधिकारी पवन गायकवाड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष कदम, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी किरवे यांच्यासह जिल्ह्यातील इतर कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहन देऊन कार्यक्षमता वाढविणे, विकासाला स्पर्धात्मक वातावरण देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. लोकसहभागातून ग्रामविकासाची चळवळ उभी करणे, नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे तसेच आरोग्य, शिक्षण, उपजीविका व सामाजिक न्याय क्षेत्रात ग्रामपंचायतींचा सक्रीय सहभाग वाढविणे, यावर या अभियानात भर देण्यात आला आहे.
दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम असे विविध घटक समाविष्ट आहेत. प्रत्येक घटकासाठी निश्चित गुणांकन ठेवून ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर बहुस्तरीय पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे.
कराड येथील कृषी प्रदर्शनात उभारलेल्या या लाईव्ह मॉडेलमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे व अंमलबजावणीची दिशा प्रत्यक्ष पाहता येत असून ग्रामविकासासाठी लोकसहभाग किती महत्वाचा आहे, हे नागरिकांना सहजपणे समजत आहे. त्यामुळे हे लाईव्ह मॉडेल केवळ प्रदर्शनाचे आकर्षण न राहता, ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठीची प्रेरणादायी मांडणी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चौकट –
जिल्ह्यातील शेती उत्पादनांनी वेधले लक्ष….जिल्हा परिषद कृषी विभाग या स्टॉलवर शेतकऱ्यांच्या मार्फत आलेली विविध नाविन्यपूर्ण फळे फुले भाजीपाला यांचे नमुने ठेवण्यात आले आहे, ते लक्षवेधक ठरत आहेत. शेतकऱ्यांचे कुतूहल वाढत आहे. आपल्या भागात या पद्धतीची शेती उत्पादने घेतली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. यामध्ये प्रामुख्याने भरतगावचा फणस, गोंदीची चेरी टोमॅटो, चिमणगावचा टरबूज, पोतलेची केळी, पेडगावचा निशिगंध, पेरू, पाडळीचा पपनस, लक्ष्मणफळ, कासवंडची रासबेरी, करवडीची झुकेनी, रिसवडचा ड्रॅगन फ्रुट या व अशाच सातारा जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेती उत्पादनांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर शेतकरी कोणती आणि कशा पद्धतीने पिके घेत समृद्धीकडे वाटचाल करत आहेत याची माहिती या स्टॉलवरून थेट शेतकऱ्यांना मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »