एआय व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार पालकमंत्री शंभूराज देसाई; कराडच्या यशवंत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

एआय व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार
पालकमंत्री शंभूराज देसाई; कराडच्या यशवंत कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
भारत कृषिप्रधान देश असून, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. आज ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असून, त्यातून कृषीविषयक माहिती, बाजारभाव व विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला जात आहे. शेतीमध्ये अत्याधुनिक अवजारे व एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि त्यात कराडचे कृषी प्रदर्शन मोलाचे योगदान देईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व खाणीकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी खासदार नितीनकाका पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, स्वर्गीय विलासकाकांनी दूरदृष्टीतून यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू केलेले हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आज कराडसह सातारा व लगतच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले आहे. शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, नवी दिशा देण्याचा त्यांचा हेतू आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
खासदार नितीनकाका पाटील म्हणाले, या कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक स्टॉल उभारण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या नफ्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी ऊस पिकासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याअंतर्गत एक एकर जमीनधारक शेतकऱ्याला दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्याच्या माध्यमातून २०० शेतकरी, अशा एकूण २ हजार शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.
यामध्ये जिल्हा बँकेतून दहा हजार रुपये, व्हीएसआयमार्फत ९,५०० रुपये अनुदान देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी पाच हजार रुपयांची स्वतःची गुंतवणूक करायची आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी बारामती कृषी विद्यापीठासोबत करार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उदयसिंह पाटील म्हणाले, स्वर्गीय विलासकाकांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सुरू केलेल्या या कृषी प्रदर्शनाचा आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना लाभ होत आहे. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी या प्रदर्शनात सर्वांगीण माहिती देण्यात येत आहे. भविष्यातही बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.






