जीवनशैलीव्यवसाय

पश्चिम महाराष्ट्रातील जनसंपर्क क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार ‘पी.आर.एस.आय.’च्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना; नूतन कार्यकारिणी जाहीर

पश्चिम महाराष्ट्रातील जनसंपर्क क्षेत्राचे क्षितीज विस्तारणार
‘पी.आर.एस.आय.’च्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना; नूतन कार्यकारिणी जाहीर
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया’ (पी.आर.एस.आय.) या संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. या चॅप्टरमध्ये कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यात जनसंपर्क व माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचा समावेश असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनसंपर्क क्षेत्राचे क्षितीज विस्तारण्यास मदत होणार आहे.
पी.आर.एस.आय. ही संस्था भारतात १९६६ पासून जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत लोकांची व्यावसायिक संघटना आहे. जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समाजात जागृती, जनसंपर्क मूल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, तसेच जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, संशोधनास प्रोत्साहन अशी विविध प्रकारचे उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.
संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची नवीन कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये अध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागप्रमुख प्रा.डॉ. निशा मुडे-पवार, उपाध्यक्षपदी ‘नॅक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील तर सचिवपदी महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची निवड झाली आहे. तसेच सहसचिवपदी डॉ.अनुराधा इनामदार; तर कोषाध्यक्षपदी तुतारी जाहिरात संस्थेचे प्रमुख सचिन मोरे यांची नियुक्ती झाली आहे.
समितीत सदस्य म्हणून वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, दैनिक पुढारीचे निवासी संपादक राजेंद्रकुमार चौगुले, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील प्रा.डॉ. अंबादास भास्के, कणेरी मठ कोल्हापूरचे विवेक सिद्ध यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर सल्लागार समितीत महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे वरिष्ठ सहायक संचालक रवींद्र राऊत, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व प्रा.डॉ. शैलेंद्र सडोलीकर यांची; तर विद्यार्थी नोंदणी समितीत अहमदनगर कॉलेजचे प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातील डॉ. नितीन रणदिवे, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. वृषाली बर्गे, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. तेजस्विनी कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच प्रसिद्धी समितीत कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचे प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी सुशील लाड, संवादतज्ज्ञ चंद्रकांत कबाडे, लोकमतचे पत्रकार डॉ. शेखर वानखेडे आणि विवेक पोर्लेकर यांची नियुक्ती झाली आहे.
जनसंपर्क क्षेत्रातील नवोदितांना लाभ
‘पी.आर.एस.आय.’ संस्थेच्या माध्यमातून जनसंपर्क व माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक, प्राध्यापक, पत्रकार व या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणारे विद्यार्थी यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच देशभरातील तज्ज्ञ मंडळींचे ज्ञान व अनुभव सर्वांना स्थानिक पातळीवर मिळणार आहेत. याचा सर्वात जास्त फायदा जनसंपर्क व पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थांना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »