
कराड विटा महामार्गावर कराड जवळ भीषण अपघात
चारचाकी आयशरच्या धडकेत दोनजण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी
ओगलेवाडी रेल्वे पुलावरील घटना; मित्राचा गावदेव करून येताना काळाचा घाला
कराड : संतोष शिंदे-
कराड विटा महामार्गावर कराड जवळील ओगलेवाडी, ता. कराड येथील रेल्वे पुलावर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. भरधाव चारचाकी गाडीने समोरून येणाऱ्या आयशर टेंपोला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात चारचाकी गाडीचा चुराडा झाला असून, आयशर टेंम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत आयशर चालक दिगंबर सोपान धुळे (वय 32) रा. लिंबोटी जि. नांदेड यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
ओमकार राजेंद्र थोरात (वय 28) व गणेश सुरेश थोरात (वय 25) दोघेही रा. ओंड, ता. कराड अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर ऋषिकेश कुबेर थोरात (वय 28) रा. ओंड व रोहन पवार (वय 25) पुर्ण नाव व पत्ता समजला नाही, हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री ओंड येथील युवक मित्राचा गावदेवचा कार्यक्रम करून चारचाकी गाडीने कडेगाव बाजूकडून ओंडला परत निघाले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांची चारचाकी ओगलेवाडी येथील रेल्वे पुलावर आली, त्याचवेळी कराडहून विटयाच्या दिशेला निघालेला आयशर टेम्पो समोरून आला. यावेळी भरधाव चारचाकी गाडीने आयशर टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. यात चारचाकी गाडीचा चुराडा झाला, तर आयशर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर आयशर टेम्पो चालकाने अपघातग्रस्त चारचाकीत पाहिले असता चालकासह तीन युवक त्याला बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. लोकांच्या मदतीने या तिघांनाही चारचाकीतून बाहेर काढण्यात आले. तर चौथा जखमी युवक स्वत:हून चारचाकी बाहेर आला.
दरम्यान, रुग्णवाहिकेतून जखमी युवकांना उपजिल्हा रुग्णालयात आली. मात्र तत्पुर्वीच ओमकार थोरात व गणेश थोरात यांचा मृत्यू झाला होता. तर ऋषिकेश थोरात व रोहन पवार यांना पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.






