जीवनशैली

कराड लोकशाही आघाडी सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देण्यास सक्षम बाळासाहेब पाटील; प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक,समविचारी मंडळींना घेऊन निवडणूक लढवणार

कराड लोकशाही आघाडी सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देण्यास सक्षम
बाळासाहेब पाटील; प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक,समविचारी मंडळींना घेऊन निवडणूक लढवणार
कराड: ग्राम दौलत नेटवर्क –
कराड नगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत कराड लोकशाही आघाडी सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देण्यास सक्षम असून, राजकारणापलीकडे जाऊन सर्व समविचारी मंडळींना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्रि साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले.
सोमवार पेठ येथील सारडा लॉन येथे आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीस कराड लोकशाही आघाडीचे शहर व प्रभागनिहाय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड हे ऐतिहासिक व शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध शहर आहे. नगरपालिकेवर दीर्घकाळ प्रशासक असल्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्यास अडचणी आल्या. मात्र, कराडने नेहमीच एकात्मतेची परंपरा जपली आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्याचा वारसा आणि पी. डी. पाटील यांच्या दीर्घ नगराध्यक्ष कार्यकाळामुळे शहराचा सर्वांगीण विकास झाला.
ते म्हणाले, मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना शासनाच्या विविध योजनांमधून शहरात अनेक विकासकामे राबवली. मात्र, मंत्रीपद लवकर गेल्याने काही कामे अपुरी राहिली, याचे शल्य आहे. तरीही आगामी काळात कराडच्या सर्वांगीण विकासासाठी लोकशाही आघाडी कटिबद्ध आहे. ‘माझं गाव – कराड, मी गावासाठी’ ही संकल्पना राबवत आम्ही शहराच्या शांततामय आणि प्रगतिपथावर वाटचाल करू.
तसेच लोकशाही आघाडीने महापुर, कोरोना यासारख्या संकटांमध्ये नागरिकांच्या सेवेत कार्य केले आहे. आगामी निवडणुकीत नागरिकांनी या आघाडीला शहराच्या विकासाची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीत ॲड. सतिश पाटील, मिलींद कांबळे, दाऊद सुतार, अक्षय सुर्वे, मुसद्दीक आंबेकरी, डॉ. अनिल वाघमारे, ॲड. विद्याराणी साळुंखे, ॲड. मानसिंगराव पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. सर्वांनी बाळासाहेब पाटील यांच्या निर्णयावर एकमत दर्शवून, एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील (काका), ॲड. मानसिंगराव पाटील, माजी नगराध्यक्षा ॲड. विद्याराणी साळुंखे, प्रा. उमाताई हिंगमिरे, तसेच विविध प्रभागांतील माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी, सूत्रसंचालन ॲड. पी.एन. पाटील यांनी, प्रताप ऊर्फ पोपटराव साळुंखे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »