दिवाळीचा हाऊसफुल संडे! चाकरमान्यांची खरेदीसाठी झुंबड; सलग सुट्ट्यांमुळे कराडची बाजारपेठ तुडुंब

दिवाळीचा हाऊसफुल संडे!
चाकरमान्यांची खरेदीसाठी झुंबड; सलग सुट्ट्यांमुळे कराडची बाजारपेठ तुडुंब
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळी सणाच्या खरेदीचा उत्साह रविवारी शिगेला पोहोचला. अभ्यंगस्नानाच्या आदल्या दिवशीचा रविवार अक्षरशः हाऊसफुल संडे ठरला. सलग शनिवार आणि रविवारची सुट्टी आल्याने चाकरमान्यांनी सणाची खरेदी रविवारी उरकली. शहरात दिवसभर तुडुंब गर्दी, वाहतूक कोंडी आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
दिवाळी म्हटलं की आनंद, गोडधोड आणि खरेदीचा उत्सवच! फराळ साहित्य, नवीन कपडे, दागदागिने, आकाशकंदील आणि लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदीसाठी रविवारी कराडच्या बाजारपेठेत नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवली. तालुक्यातील सर्व भागांतून नागरिक बाजारात दाखल झाले होते.
शहरातील शिवतीर्थ-दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक ते कन्या प्रशाला मार्ग, तसेच पांढरीचा मारुती परिसर या मुख्य मार्गांवर दिवसभर गर्दी ओसंडून वाहिली. महिलांनी कपडे व दागदागिने खरेदीत आघाडी घेतली, तर बालचमुंनी किल्ले, सैनिक, फटाके आणि आकाशकंदील खरेदीसाठी हट्ट धरला.
दरम्यान, यावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. वाढत्या महागाईमुळे नोकरदार वर्गही मेटाकुटीला आला आहे. मात्र काही आवश्यक वस्तूंवरील जीएसटी सरकारने कमी केल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या सर्व आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पैशाची जुळवाजुळ करून सणासाठी मनसोक्त खरेदी केली. त्यामुळे बाजारपेठेतील दुकानदार, किरकोळ विक्रेते आणि स्टॉलधारकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते.
रविवारी संध्याकाळपर्यंत शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर वाहनांची रेलचेल होती. पार्किंगच्या अभावामुळे काही ठिकाणी कोंडी झाली, तरीही नागरिकांनी या त्रासाकडे दुर्लक्ष करून उत्सवी वातावरणाचा आनंद घेतला. “हीच खरी दिवाळीची गडबड” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
चौकट :
किरकोळ विक्रेत्यांची दिवाळी आनंदी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ विक्रेत्यांना दिलासा देणाऱ्या सूचना दिल्या होत्या. रस्त्यालगतचे स्टॉल हटवू नयेत, तसेच ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांवर दंड आकारू नये, असे निर्देश देण्यात आले. पालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी सहकार्य केल्याने लहान व्यापाऱ्यांची दिवाळीही आनंदी झाली.
चौकट :
महामार्गासह कराडचे रस्तेही तुडुंब!
दिवाळी निमित्त पुणे-मुंबईकडून गावी परतणाऱ्या चाकरमान्यांमुळे पुणे–बंगळुरू महामार्गावरील खोडशी ते पाचवड फाटा दरम्यानचा मार्ग शनिवारी दिवसभर जाम झाला होता. कोल्हापूर नाक्यावर सुरू असलेल्या पाईपलाइनच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. रविवारीही तीच परिस्थिती होती. दरम्यान, तालुक्यातील नागरिक खरेदीसाठी कराडमध्ये दाखल झाल्याने शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळही ओसंडून वाहिले.