नारायणवाडीचा आदर्श उपक्रम — ‘स्वच्छतेकडे वाटचाल’ अभियानातून उजळले गावाचे रूप!

नारायणवाडीचा आदर्श उपक्रम — ‘स्वच्छतेकडे वाटचाल’ अभियानातून उजळले गावाचे रूप!
कराड : ग्रामदौलत न्यूज नेटवर्क-
कराड तालुक्यातील नारायणवाडी (ता. कराड) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “स्वच्छतेकडे वाटचाल — माझं गाव, स्वच्छ गाव, सुंदर गाव!” या घोषवाक्याखाली रविवारी “स्वच्छता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात महिला वर्गाचा विशेष आणि मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत माळी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सकाळी लवकरच महिला, पुरुष, युवक व विद्यार्थी वर्ग यांनी एकत्र येत कालेटेक ते आटके टप्पा या परिसरात स्वच्छतेची मोहीम राबवली. हातात झाडू, फावडे, कचऱ्याच्या पिशव्या घेऊन सर्वांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले. रस्ते, नाल्या, शाळा परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून गावाला नवचैतन्य लाभले.
महिला व युवक मंडळींनी प्रचंड उत्साहाने कचरा गोळा करून ठरवलेल्या ठिकाणी टाकला. विद्यार्थ्यांनी “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. परिणामी, संपूर्ण गाव स्वच्छ, हिरवागार व सुंदर वातावरणाने उजळून निघाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.
अभियानाच्या प्रारंभी ग्रामस्थांनी आदर्श ग्राम मान्याचीवाडी येथे भेट देऊन स्वच्छतेचे उत्कृष्ट व्यवस्थापन प्रत्यक्ष पाहिले. त्याचबरोबर, गावात मुलगी जन्माला आली की ग्रामपंचायतीतर्फे पाच आंब्याची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला — समाजात पर्यावरण संवर्धन आणि ‘बेटी बचाओ’चा संदेश देणारा हा अभिनव उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.
नारायणवाडीच्या या सामूहिक प्रयत्नातून गावात स्वच्छता, एकता आणि पर्यावरणप्रेमाचे सुंदर उदाहरण घालून दिले गेले आहे. असा उपक्रम प्रत्येक गावाने आदर्श म्हणून स्वीकारावा, हीच खरी ‘समृद्ध पंचायतराज’ची दिशा आहे!
या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रशांत माळी यांनी यांनी सर्वांचे आभार मानले.